नाशिक : येवला तालुक्यातील ममदापूरला भरली काळविटांची जत्रा

ममदापूर नाशिक,www.pudhari.news

नाशिक : आनंद बोरा

येवला तालुक्यातील ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात सध्या काळाविटांचा (Blackbuck) ताशी ८० किमी धावण्याचा थरार बघण्यासाठी वन्यप्रेमींची एकच गर्दी बघावयास मिळत आहे. भारतीय उपखंडाचे प्रतीक म्हणून ज्या काळविटाकडे बघितले जाते, त्या काळविटांना या ठिकाणी विस्तृत स्वरूपात नैसर्गिक अधिवास प्राप्त झाला आहे. सध्या या ठिकाणी काळविटांची जत्रा भरल्याचे चित्र असून, ते बघण्यासाठी देशभरातील पर्यटक या ठिकाणी गर्दी करीत आहेत.

नाशिकपासून १२७ किमी अंतरावरील ममदापूर राखीव क्षेत्रात काळविटांच्या (Blackbuck) २६ प्रजाती आढळतात. वनविभागाने या प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी पाच गावांतील काही क्षेत्र राखीव म्हणून घोषित केले आहे. यामध्ये राजापूर, सोमनाथ जोश, ममदापूर, खरवंडी आणि देवदारी या गावांचा समावेश आहे. वनविभागाने गवताळ कुरण संरक्षित केल्याने याठिकाणी जैवविविधता विपुल प्रमाणात बघवयास मिळते. याशिवाय या भागात दुर्मीळ होत चाललेले लांडगे, तरस, खेखड आदी वन्यप्राण्यांसह विविध जातींचे पक्षी, वनफुले, सरडे, फुलपाखरे, वृक्ष हेदेखील आकर्षित करतात.

पर्यटकांसाठी नेचर इंटरप्रिटेशन सेंटर, टॉयलेट, पाथवे, सोलर लाईट, मचान, कॉटेज, तंबू, सायकल पाथ आदी व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. या परिसत जलयुक्त शिवाराचे कामदेखील मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. सध्या याठिकाणी काळविटांची जत्रा भरल्याने, त्यांच्या वेगाचा थरार बघण्यासाठी देशभरातील पर्यटक ममदापूरला येत आहेत.

दोन मीटरची उडी  (Blackbuck)

काळवीट हे हरीण प्रामुख्याने भारतात आढळून येते. नर काळवीट हा काळ्या रंगाचा असून, मादी ही भुऱ्या रंगाची असते. नरांना प्रामुख्याने शिंगे असतात. काळवीट ७४-८४ सेमी (२९-३३ इंच) उंचीपर्यंत वाढू शकते. नराचे वजन सरासरी वजन ३८ किलो असते. हा शाकाहारी जंगली प्राणी आहेत. हरणात सारंग हरीण आणि कुरंग हरीण असे दोन मुख्य प्रकार आहेत. काळवीट हे कुरंग प्रकारात मोडते. तो ताशी ८० किमी वेगाने धावू शकतो. तसेच २ मीटरपेक्षा जास्त उंच उडी मारू शकतात.

ममदापूर मधील कुरणक्षेत्र वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून, गवताच्या अनेक जाती आम्ही रोपवाटिकेमध्ये तयार केल्या असून, त्याची लागवड करीत आहोत. यामुळे काळविटांची संख्या वाढत असून, अनेक गवताळ पक्षीदेखील येत आहेत. गोपाल हरगावकर, वनरक्षक, येवला

हेही वाचा :

The post नाशिक : येवला तालुक्यातील ममदापूरला भरली काळविटांची जत्रा appeared first on पुढारी.