आरोप सिध्द झाल्यास फाशी घेईल – सुधाकर बडगुजर

सुधाकर बडगुजर, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राजकीय सूडापोटी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप करत एसीबीने केलेले आरोप सिध्द झाल्यास एसीबी अधीक्षकांच्या दालनात जाहीरपणे फाशी घेईन, अशा शब्दांत ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी विरोधकांना आव्हान दिले आहेत. एसीबीने मला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पण मला कोर्टातून ऑर्डर झाली आहे, ते १०६ पाने आहेत ते दाखल करण्यासाठी वेळ लागणार असल्याने आठ दिवसांची मुदत मागितली आहे. पोलीसांनी सद‌्सद्विवेकबुध्दी जागरूक ठेवावी. खोटे गुन्हे दाखल करू नयेत, असे आवाहनही बडगुजर यांनी केले आहे.

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताशी संबंध असल्याच्या आरोपावरून विधानसभेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिल्यानंतर बडगुजर यांची नाशिक पोलिसांकडून चौकशी सुरु झाली आहे. यादरम्यान रविवारी लाचलुचपत विभागाकडून बडगुजर यांच्यावर नगरसेवक पदावर असताना त्यांच्या कंपनीच्या नावाने कामे घेवून महापालिकेची फसवणूक केल्याचा नवा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर बडगुजर यांनी शालिमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना आपल्यावरील कारवाईमागे राजकीय सूडभावना असल्याचे स्पष्ट केले. बडगुजर म्हणाले की, एसीबी(लाचलुचपत प्रतिबंधक विभागा)ने रविवारी सांयकाळी सात वाजता नोटीस काढली. साडेसात वाजता माझ्या दोन्ही बंगल्यावर छापा टाकण्यात आला. बंगल्याची पुर्ण झाडाझडती घेतली. त्यापुर्वी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. माझ्या ५३ वर्षाच्या कारकिर्दीत माझ्‍यावर एकही फसवणुकीचा गुन्हा नाही. साधा अदखलपात्र गुन्हा देखील नोंद नाही. त्यामुळे लाचलुचपत विभागाची कारवाई जिव्हारी लागली. बडगुजर कंपनीच्या स्थापनेनंतर २००६ मध्ये कंपनीतून निवृत्ती घेतली. त्यासंदर्भात करारपत्राची नोंदणी देखील झाली आहे. याचसंदर्भात न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतर २०११ मध्ये न्यायालयात निकाल देखील झाला. त्यात स्पष्टपणे कंपनीत माझी नियुक्ती व सेवानिवृत्ती यासंदर्भातील उल्लेख आहे. तक्रार दाखल करताना ही बाब लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती नव्हती का? असा सवाल करत सध्या जे काही चालु आहे ते अन्याय करण्याच्या दृष्टीने चालु आहे. पोलिस दबावाखाली काम करतं आहे. नाशिक म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेचा अध्यक्ष असताना कार्यालय सील करण्याची कारवाई देखील अशाचप्रकारे करण्यात आली होती. परंतू न्यायालयाने निकाल दिल्यानंतर पोलिसांना केस मागे घ्यावी लागली, असा संदर्भही बडगुजर यांनी दिला.

तर मानवाधिकार आयोगाकडे धाव!  (Sudhakar Badgujar)

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. माझ्यावर ५३ वर्षात एकही दखलपात्र गुन्हा नोंद नाही. सत्ता येत-जात असते. कपाळावर कोणी सत्तेचा अमरपट्टा लिहून आणलेला नाही. त्यामुळे पोलीसांनी दबावाखाली येऊन चुकीच्या पध्दतीने केसेस दाखल करू नये, असे आवाहन करत यासंदर्भात दक्षता समिती किंवा मानवाधिकार आयोगाकडे धाव घेणार असल्याचे बडगुजर म्हणाले.

हेही वाचा-

The post आरोप सिध्द झाल्यास फाशी घेईल - सुधाकर बडगुजर appeared first on पुढारी.