नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत संघर्षाची ठिणगी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत संघर्षाची ठिणगी पडली आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नाशिक दौऱ्यानंतर जोमात आलेल्या भाजपने नाशिकच्या जागेवर सांगितलेला दावा शिवसेने(शिंदे गटा)ने खोडून काढला आहे. नाशिक मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराने सलग दोन वेळा निवडून येत इतिहास घडविला आहे. त्यामुळे या जागेवर शिवसेने (शिंदे गटा) चाच हक्क आहे, असा दावा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे. फेब्रुवारी अखेरीस अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना(शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) महायुती तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी(शरद पवार गट) व शिवसेना(ठाकरे गट) महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहे. नाशिकसह राज्यातील अन्य महत्त्वाच्या जागांवर महायुती, महाविकास आघाडीतील तिनही घटक पक्षांकडून दावा केला जात असल्यामुळे जागा नेमकी कोणाला सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे. शिवसेनेचे हेमंत गोडसे हे या मतदार संघातून सलग दोन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेने(शिंदे गटा)चा मूळ दावा आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजपने या जागेवर दावा सांगण्यास सुरूवात केली आहे. भाजपतर्फे केदा आहेर, आ. ॲड. राहुल ढिकले, माजी सभागृहनेते दिनकर पाटील, ॲड. नितीन ठाकरे आदींची नावे चर्चेत आहेत. यासंदर्भात भाजपच्या कोअर कमिटीने प्रदेश नेत्यांना अहवाल पाठवत ही जागा पदरात पाडून घेण्याची विनवणी केली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार, सर्वाधिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आहेत. भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने ही जागा भाजपलाच मिळावी, अशी मागणी या अहवालाद्वारे पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेने(शिंदे गटा)चे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्याशी चर्चा केली असता भाजपचा दावा त्यांनी खोडून काढला आहे. नाशिक हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे गोडसे यांनी सलग दोन वेळा निवडून येत इतिहास रचला आहे. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. येथील मतदार शिवसेनेच्या विचारांचे आहेत. मित्रपक्ष भाजपने दावा केला असला तरी ही जागा शिवसेनेच्याच वाट्याला येईल, असा दावा बोरस्ते यांनी केला.

शहा, शिंदे घेणार निर्णय
लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा निर्णय भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शिवसेनेचे पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्टवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संयुक्त बैठकीत होईल. अद्याप यावर कुठलीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे त्यावर आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही जिल्हाप्रमुख बोरस्ते यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. नाशिक हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळावी, ही मागणी आहे. पक्षश्रेष्ठी निर्णय घेतली. महायुतीचा उमेदवार निवडून यावा, हेच अंतिम ध्येय असणार आहे. – अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट).

The post नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत संघर्षाची ठिणगी appeared first on पुढारी.