नाशिक शहरात २८ दिवसांत ७३ दुचाकी चोरीला

Nashik Bike Theft

नाशिक : गौरव अहिरे

शहरातून चोरट्यांनी १ ते २८ जानेवारी या कालावधीत ७२ दुचाकी व एक रिक्षा अशी एकूण ७३ वाहने चोरून नेली आहे. त्यापैकी मोजक्याच दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास लागला असून, बहुतांश वाहने चाेरट्यांच्याच ताब्यात आहेत. चोरीस गेलेल्या दुचाकींची किंमत २२ लाख ९२ हजार रुपये इतकी आहे.

शहरात दुचाकी चोरी होण्याचे प्रकार नियमित घडतात. त्यामुळे दुचाकीचालकांना आर्थिक, मानसिक फटका बसतो. पोलिसांकडे तक्रार करूनही वाहनांचा शोध लागत नसल्याने चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. सुरक्षिततेची खबरदारी घेऊनही वाहने चोरीस जात असल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्यानुसार शहरातून १ ते २८ जानेवारीदरम्यान ७३ वाहने लंपास झाली. त्यातील मोजक्याच वाहनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. सर्वाधिक १३ वाहने अंबडच्या हद्दीतून चोरीस गेली असून, त्याखालोखाल पंचवटीतून १२ व नाशिकरोडच्या हद्दीतून ११ वाहने चोरीस गेली आहेत.

पोलिस ठाणेनिहाय वाहन चाेरी (कंसात वाहन संख्या)

अंबड (१३), पंचवटी (१२), नाशिकरोड (११), आडगाव (०७), सातपूर (०६), भद्रकाली (०६), इंदिरानगर (०४), मुंबईनाका (०३), सरकारवाडा (०३), गंगापूर (०३), उपनगर (०२), म्हसरूळ (०२), देवळाली कॅम्प (०१)

वाहनांची स्वस्तात विक्री

वाहन चोरी केल्यानंतर चोरटे ग्रामीण भागात या वाहनांची कवडीमोल किमतीत विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. त्यासाठी वाहनांची कागदपत्रे नंतर देतो असे सांगून सुरुवातीस ५ ते २० हजार रुपये घेऊन चाेरटे निघून जातात. त्यानंतर संबंधित खरेदीदारही कागदपत्रांची मागणी करताना दिसत नाही, त्यामुळे चोरीचे वाहने परजिल्ह्यात किंवा ग्रामीण भागात विक्री करून चोरटे पैसे कमवत असल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक शहरात २८ दिवसांत ७३ दुचाकी चोरीला appeared first on पुढारी.