नाशिक : शिक्षण उत्सवात मिळणार नवउपक्रमांना व्यासपीठ

नाशिक : वैभव कातकाडे
बुधवारी (दि. 29) होऊ घातलेल्या शिक्षण उत्सव 2022 -23 परिषदेमध्ये जिल्ह्यातील शिक्षकांनी तयार केलेल्या 20 नवउपक्रमांना (ई-20) व्यासपीठ मिळणार आहे. यांच्या प्रेरणेने जिल्ह्यातील इतर भागांतही याची अंंमलबजावणी होण्यासाठी चर्चा होणार आहे. नाशिक जिल्हा परिषद आणि लीडरशीप फॉर इक्वॅलिटी (एलएफई एनजीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने हा शिक्षण उत्सव अंबड येथील नाशिक इंजिनियरिंग क्लस्टर येथे होत आहे.

जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या सर्व शासकीय शैक्षणिक संस्था, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने हा उत्सव घेण्यात येत आहे. यात जिल्हाभरातून शिक्षक, पर्यवेक्षीय यंत्रणा, आणि अंगणवाडी पर्यवेक्षीय यंत्रणेकडून त्यांनी राबविलेल्या नवउपक्रमांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यातून 20 नवउपक्रमांची निवड केली गेली आहे. त्यांचे सादरीकरण स्टॉलच्या माध्यमातून या शिक्षण उत्सवामध्ये करण्यात येईल. त्याची जिल्ह्यात इतरत्र ठिकाणी कशी अंमलबजावणी करता येईल यावर चर्चा करण्यात येईल. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, एलएफईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दामिनी माईनकर यादेखिल उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. निपुण भारत मिशनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी तसेच महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या भूमिका आणि जबाबदार्‍या या विषयावर अतुल गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी व पर्यवेक्षीय यंत्रणेची भूमिका आणि जबाबदारी या विषयावर सचिन जोशी मार्गदर्शन करणार आहेत.

विविध संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक
या उत्सवानंतर एज्युकेशन फ्रेंड्स ऑफ नाशिक अशी बैठक होणार आहे. त्यात जिल्ह्यातील शैक्षणिक विभाग, शैक्षणिक विषयांत काम करत असलेल्या बिगरशासकीय संस्था तसेच शिक्षणासाठी सीएसआर पुरविणार्‍या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : शिक्षण उत्सवात मिळणार नवउपक्रमांना व्यासपीठ appeared first on पुढारी.