नाशिक : शेतकरी प्रकल्पग्रस्तांची भरपावसात मंत्रालयाकडे पायी कूच

सिडको www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये एसटीपी प्लांटला तातडीने मंजुरी द्यावी व प्लांट उभा करावा तसेच गेल्या 20 वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि. २६) अंबड, नाशिक येथून शेतकऱ्यांनी भरपावसात मंत्रालयाकडे कूच केले.

मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार असल्याची माहिती अंबड सातपूर प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिली. मोर्चात अंबड व सातपूर येथील 200 हून अधिक प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी झाले आहेत. प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर. समवेत बंडोपंत दातीर, शांताराम फडोळ, माजी नगरसेवक राकेश दोंदे, रामदास दातीर, शरद फडोळ, महेश दातीर, गोकुळ दातीर, त्र्यंबक मोरे, अविनाश फडोळ, शरद कर्डिले, पांडुरंग दोंदे यांच्यासह 200 शेतकरी यात सहभागी झाले आहेत.

अशा आहेत मागण्या…

अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये एसटीपी प्लांटला तातडीने मंजुरी द्यावी व प्लांट उभारावा.

पीएपी भूखंडापासून वंचित असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पीएपी परिपत्रकातील जाचक अटी काढून भूखंड द्यावे.
नाशिक महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामाबाबतीतील नोटिसा मागे घेण्यात याव्यात.
बांधलेल्या तात्पुरत्या शेडधारकांना आकारण्यात येणारी वाढीव घरपट्टी सवलतीच्या दरात करून द्यावी.
वाढीव घरपट्टी आकारण्यात येऊ नये तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पाठविण्यात आलेल्या दंडात्मक नोटिसा मागे घेण्यात याव्यात.
याबरोबरच अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याला त्वरित मंजुरी द्यावी.
पांजरापोळ उद्योगासाठी संपादन करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. पांजरापोळ जमिनीचे त्वरित संपादन करण्यात यावे, जेणेकरून इतर शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही.

हेही वाचा:

The post नाशिक : शेतकरी प्रकल्पग्रस्तांची भरपावसात मंत्रालयाकडे पायी कूच appeared first on पुढारी.