नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांमुळे शालिमार भागातील 50 दुकानांचे नुकसान

स्मार्ट सिटी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून जुने नाशिकमधील गावठाण भागात पाणी, गटार, वीज व रस्त्यांची कामे कोणत्याही प्रकारचे नियोजन न करताच सुरू असल्याने नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. शालिमार भागातील पटेल कॉलनीत कामे करताना पाण्याची लाइन तुटल्याने येथील सुमारे 50 दुकाने पाण्यात आहेत. यामुळे या कामांची चौकशी करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते राजेंद्र बागूल यांनी केली आहे.

आजमितीस जुने नाशिक, पंचवटी, शालिमार या भागात विविध प्रकारची कामे एकाच वेळी सुरू असल्याने शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शालिमारजवळील पटेल कॉलनी येथे गेल्या दोन महिन्यांपासून दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. संपूर्ण शिवाजी रोड परिसर आरोग्यविषयक समस्यांनी वेढला गेला आहे. रस्त्याचे खोदकाम करत असताना या अगोदरच्या पाण्याच्या आणि गटाराच्या लाइनची कामे ठेकेदाराने केली नाही. आहे त्याच स्थितीत रस्ते बुजवले गेले. खोदकामही योग्य प्रकारे न केल्यामुळे रस्त्याची लांबी, रुंदी सुद्धा एकसारखी राहिलेली नाही. पाणीपुरवठ्याच्या लाइन वाकड्या झाल्यामुळे पाणी एकमेकांत मिसळले जात असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका होऊ शकतो, अशी भीती बागूल यांनी व्यक्त केली आहे. पटेल कॉलनीतील जवळपास 50 दुकाने पाण्यात आहेत. त्यामुळे व्यापार्‍यांना आपली दुकाने बंद ठेवावी लागली. परिसरातील नागरिकही अतिशय त्रस्त आहेत. स्मार्ट सिटी आणि महापालिका या कामासाठी एकमेकांकडे बोट दाखवत आहे. यामुळे दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. महापालिकेने नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांची ताबडतोब सोडवणूक करावी, अन्यथा महापालिकेच्या व स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा बागूल यांनी दिला आहे. स्मार्ट सिटीची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत आहे. सर्व कामाच्या गुणवत्तेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांमुळे शालिमार भागातील 50 दुकानांचे नुकसान appeared first on पुढारी.