नाशिक : हॉस्पिटलमध्ये अवैध सोनोग्राफी मशीन सापडल्याने डॉक्टर दाम्पत्यास कारणे दाखवा

अवैध सोनोग्राफी प्रकरण नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोडमधील बालाजी हॉस्पिटलमध्ये अवैधरीत्या गर्भलिंग निदान चाचणी करणारे सोनोग्राफी मशीन सापडल्याने तसेच विनापरवाना रुग्णालय सुरू केल्याप्रकरणी मनपाचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांच्यासह पत्नी डॉ. सुनीता भंडारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत नाशिक न्यायालयात भंडारीवर गुन्हे दाखल करण्यासाठी विशेष सरकारी वकिलाकडे कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. तसेच महापालिका सेवेत असताना खासगी वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणी तसेच बेकायदेशीरपणे सोनोग्राफी मशीन आढळून आल्याने डॉ. भंडारींवर बडतर्फीची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव बुधवारी (दि.२८) आयुक्तांकडे सादर केला आहे.

पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत कोणतेही मशीन हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित करण्याआधी किंवा त्याचा वापर करण्यापूर्वी मनपा वैद्यकीय विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असते. गेल्या १६ डिसेंबर रोजी नाशिकरोड येथील देवळाली गाव परिसरात बालाजी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मनपाच्या पथकाने धाड टाकली. त्यात अनधिकृत सोनोग्राफी मशीन आढळून आले. या रुग्णालयाकडे परवानाही नव्हता. रुग्णालयाची इमारत डॉ. भंडारी यांच्या मालकीची आहे. त्यांच्या नावाने हे रुग्णालय सुरू होते. मनपा वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी मशीनसह रुग्णालय सील केले. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास तीन ते पाच वर्षांपर्यंत शिक्षा आणि ५० हजारांच्या शिक्षेची तरतूद आहे.

विनापरवाना रुग्णालय आणि अवैधपणे सोनोग्राफी मशीन आढळून आल्याने संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसार आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला आहे.

– डॉ. बापुसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिक्षक ,मनपा

 

पीसीपीएनडी समितीसमोर हजर राहण्याचे पत्र मिळाले आहे. अदयाप कारणे दाखवा नोटीस मिळालेली नाही. मनपाला माझा खुलासा तसेच योग्य ते स्पष्टीकरण दिले जाईल.

– डॉ. राजेंद्र भंडारी, सहाह्यक वैद्यकीय अधिकारी, मनपा

हेही वाचा :

The post नाशिक : हॉस्पिटलमध्ये अवैध सोनोग्राफी मशीन सापडल्याने डॉक्टर दाम्पत्यास कारणे दाखवा appeared first on पुढारी.