निओ मेट्रोची २,१०० कोटींची तरतूद व्यपगत झाल्याने प्रकल्प गुंडाळला

निओ मेट्रो pudhari.news

नाशिक : आसिफ सय्यद

२०१७ च्या महापालिका निवडणुकांदरम्यान नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत लोकसभा निवडणुकांपूर्वी नाशिककरांना दाखविलेले ‘निओ मेट्रो’चे स्वप्न पुरते भंगले आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयात पडून असून, २०२१ मध्ये या प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आलेली २,१०० कोटींची तरतूदही आता व्यपगत झाल्याने हा प्रकल्प गुंडाळला गेल्याची माहिती समोर येत आहे.

गत लोकसभा निवडणुकांपूर्वी २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केली होती. फडणवीस यांच्या या घोषणेवर भाळत नाशिककरांनी महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती सोपविल्यानंतर फडणवीस यांनीही नाशिकमध्ये देशातील पहिली टायरबेस निओ मेट्रो साकारण्याची घोषणा केली होती. त्यामुळे हुरळून गेलेल्या नाशिककरांनी महापालिका निवडणुकांनंतर २०२१ आलेल्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपच्या झोळीत भरभरून मतांचा जोगवा टाकला. निओ मेट्रोची तयारी सुरू झाली, महामेट्रोने या संदर्भातील प्रस्ताव तयार करून नाशिकला टायरबेस मेट्रोचा प्रस्ताव राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला सादर केला. त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिकच्या निओ मेट्रोसाठी तब्बल २,१०० कोटींची तरतूदही करण्यात आली होती. त्यामुळे नाशिकमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मेट्रो धावेल, अशी अपेक्षा नाशिककरांना होती. मात्र, निओ मेट्रोचा प्रस्ताव तीन वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयात प्रलंबित आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मेळा बसस्थानकाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी निओ मेट्रोला लवकरच मंजुरी दिली जाईल, अशा शब्दांत नाशिककरांना आश्वस्त केले होते. परंतु लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतरही या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळू शकली नाही. याउलट या प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात केलेली तरतूदही व्यपगत झाल्याची माहिती समोर येत आहे.

असे होते प्रकल्पाचे आर्थिक नियोजन
निओ मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार, सिडको व महापालिका २५५ कोटी रुपयांचा वाटा तर केंद्र सरकार ७०७ कोटी रुपये तर १,१६१ कोटींचे कर्ज उभारण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. २०२३ अखेरपर्यंत मेट्रो निओ प्रकल्पाचे काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. मात्र ही मुदत संपुष्टात येऊन आता तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी प्रकल्पाची सुरुवातही होऊ शकलेली नाही.

राज्याचा प्रस्तावही धूळ खात
केंद्र सरकारकडून हालचाल होत नसल्याने गत एप्रिल २०२३ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या एका बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाला नव्याने प्रस्ताव सादर करत नाशिक रोड ते सीबीएस असा १०.४४ किमीचा टप्पा प्रायोगिक तत्त्वावर राज्य शासनामार्फत करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. त्यानंतर महापालिका व महामेट्रोच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात सिन्नर फाटा व गंगापूर रोड येथे कानेटकर उद्यानाच्या बाजूला असलेल्या तीन एकर मोकळा भूखंड देण्याची तयारी महापालिकेने केली मात्र त्यानंतर हे प्रकरणच थंड बस्त्यात गेले.

निओ मेट्रोचा प्रस्तावित मार्ग
मेट्रो निओसाठी दोन एलिव्हेटेड कॉरिडोर प्रस्तावित करण्यात आले आहेत. पहिला एलिव्हेटेड कॉरिडोर १० किमी लांबीचा असून, त्यात गंगापूर, जलालपूर, गणपतनगर, काळेनगर, जेहान सर्कल, थत्तेनगर, शिवाजीनगर, पंचवटी, सीबीएस, मुंबई नाका अशी दहा स्थानके असतील. दुसरा कॉरिडोर गंगापूर ते नाशिक रोड असा २२ किमी लांबीचा असून, त्यात गंगापूर गाव, शिवाजीनगर, श्रमिकनगर, एमआयडीसी, मायको सर्कल, सीबीएस, सारडा कॉर्नर, द्वारका, गांधीनगर, नेहरूनगर, दत्त मंदिर, नाशिक रोड अशी स्थानके असतील. सीबीएस कॉमन स्टेशन असून, या टायरबेस मेट्रोसाठी एकूण २९ स्टेशन असणार आहेत. याशिवाय दोन फीडर कॉरिडोर असतील. त्यापैकी एक सातपूर कॉलनी, गरवारे, मुंबई नाका दरम्यान चालेल तर दुसरा नाशिक रोड, नांदूर नाका, शिवाजीनगर दरम्यान चालेल.

मेट्रो निओ प्रकल्पात महत्त्वाचे
– २५ मीटर लांबीच्या २५० प्रवासी क्षमतेच्या जोड बस
– दोन एलिव्हेटेड कॉरिडोर व दोन फीडर कॉरिडोर उभारणार
– एकूण ३१.४० किलोमीटर लांबीचे एलिव्हेटर
– गंगापूर ते नाशिक रेल्वेस्थानक २२ किलोमीटरचा पहिला कॉरिडोर
– पहिल्या कॉरिडोरवर १९ स्टेशन
– गंगापूर ते मुंबई नाका १० किलोमीटरचा दुसरा कॉरिडोर
– द्वारका क्रॉसिंगवरील उड्डाणपुलावर आणखी एक उड्डाणपूल

निओ मेट्रोच्या प्रस्तावाबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाबाबत पुढाकार घेतला होता. मात्र अद्याप त्यावर पुढील निर्णय झालेला नाही. लोकसभा निवडणुकांनंतरच आता त्यावर निर्णय अपेक्षित आहे. २०२१ मध्ये या प्रकल्पासाठी करण्यात आलेली तरतूद व्यपगत झाली आहे. त्यामुळे आता नव्याने तरतूद करावी लागणार आहे. – विकास नागुलकर, अतिरिक्त कार्यकारी व्यवस्थापक, महामेट्रो

हेही वाचा:

The post निओ मेट्रोची २,१०० कोटींची तरतूद व्यपगत झाल्याने प्रकल्प गुंडाळला appeared first on पुढारी.