निफाडचही वाढलं तापमान, उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन

उष्माघात

निफाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवामागील काही दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण अधिक वाढलेले असल्याने निफाड उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उष्माघाताचा तडाखा बसलेल्या रुग्णांसाठी या कक्षात पाच खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव तांभाळे यांच्या देखरेखीखाली या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांची रुग्णांवर गरजेनुसार आवश्यक ते उपचार करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

३७ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असल्यास त्याचा मानवी शरीरास त्रास होऊ शकतो. उन्हात कष्टाची कामे करणाऱ्या लोकांना, वृद्ध व लहान मुलांना, स्थूल लोकांना, पुरेशी झोप न घेणाऱ्या लोकांना, गरोदर महिलांना, अनियंत्रित मधुमेह व हृदयरोग रुग्णांना व मद्यपींना उष्माघाताचा त्रास होण्याची जास्त शक्यता असते, असे डॉ. तांभाळे यांनी सांगितले.

त्वचा लालसर होणे, ताप येणे व डोके दुखणे, खूप घाम येणे, खूप थकवा येणे, चक्कर व उलटी येणे या प्रकारची लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळील सरकारी दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

The post निफाडचही वाढलं तापमान, उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन appeared first on पुढारी.