पाणीकपातीतून नाशिककरांची सुटका होणार

नाशिक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जायकवाडीसाठी पाणी सोडल्यानंतर महापालिकेच्या पाणीआरक्षणात झालेली कपात नाशिककरांवर पाणीकपातीचे काळे ढग निर्माण करणारी ठरली होती. परंतू गंगापूर धरणातील ६०० दशलक्ष घनफूट मृत साठा उचलण्यासाठी चर खोदण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागातर्फे तयार केला जात असून यामुळे नाशिककरांचा पाणीप्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. यामुळे महापालिकेबरोबरच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या सत्ताधाऱ्यांचीही कोंडी सुटणार आहे.

मेंढीगिरी समितीच्या अहवालाचा संदर्भ देत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून जायकवाडीत ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार धरणांतून विसर्ग करण्यात आला. मात्र याचवेळी अवकाळी पाऊसही कोसळल्याने वहनतूट कमी झाल्याने सुमारे एक टीएमसी पाण्याची बचत झाली. दरम्यान जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे नाशिक महापालिकेच्या पाणी आरक्षणामध्ये कपात करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला.

नाशिक महापालिकेने १५ आॉक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीसाठी गंगापूर धरण समुहातून ४४००, मुकणेतून १६०० तर दारणेतून १०० अशाप्रकारे एकूण ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली होती. मात्र, धरणांतील जलसाठ्याचा आढावा घेता महापालिकेच्या वाट्याला केवळ ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण आले. दैनंदिन २० दशलक्ष घनफूट पाण्याचा हिशोब करता, उपलब्ध पाणी ३१जुलै पर्यंत पुरवठा होणे शक्य नाही. जवळपास अठरा दिवसांचे पाणी कमी असल्यामुळे डिसेंबरपासून आठवड्यातील दर शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर केला होता. मात्र लोकसभा निवडणुक तोंडावर असल्यामुळे सत्ताधारी पक्षांनी तसेच विरोधी पक्षांनीही या पाणीकपातीला विरोध केल्यामुळे तूर्त या प्रस्तावावरील निर्णय महिनाभर पुढे ढकलण्यात आला होता. दरम्यान, जानेवारी महिना उजाडल्यानंतर प्रशासन पाणीकपाती संदर्भामध्ये काय निर्णय घेते याकडे लक्ष होते. मात्र प्रशासनाने धरणातील मृतसाठा उचलण्याचा प्रस्ताव तयार करत नाशिककरांना पाणीकपातीच्या संकटातून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

धरणात चर खोदणार

नाशिक शहरासाठी ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण देण्यात आले आहे. दररोज २० दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा लक्षात घेता नाशिककरांना किमान ५७५० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. आवश्यक पाणीआरक्षणात एकूण ४३६ दशलक्ष घनफूट पाण्याची तूट आहे. गंगापूर धरणात चर खोदल्यास ६०० दशलक्ष घनफूट मृतसाठा उपलब्ध होऊ शकणार आहे. त्याचबरोबर अन्यही उपाययोजना करण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागातर्फे तयार केला जात आहे.

नाशिक महापालिकेच्या पाणी आरक्षणामध्ये कपात केल्यामुळे उपलब्ध पाणी ३१ जुलै पर्यंत पुरवण्याच्या दृष्टिकोनामधून अठरा दिवसाची तूट येते. ती भरून काढण्यासाठी धरणातील मृतसाठा उचलण्याचा पर्याय आहे. त्या संदर्भात विचार केला जात आहे.

– अविनाश धनाइत, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा

 


हेही वाचा

 

The post पाणीकपातीतून नाशिककरांची सुटका होणार appeared first on पुढारी.