पीकविम्याला आधारचा अडसर, शेतकऱ्यांची होतेय मोठ्या प्रमाणात अडचण

पीक विमा योजना

नाशिक : वैभव कातकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चालू वर्षी खरिपासाठी एक रुपयात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत अर्ज करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, अर्ज करण्यासाठीं काही दिवस शिल्लक असताना अर्ज प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांची आधार क्रमांक पडताळणी होत नसल्याने पीकविमा भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, पीकविम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

शासनाने १ रुपयात पीकविम्याचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्षात ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत खर्च येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार व कृषी सचिवांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला होता. मात्र, आता शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी सतावत आहेत. शेतकरी स्वतः अर्ज प्रक्रिया करत असताना सर्व पत्ता व संबंधित माहिती भरल्यानंतर अर्ज करण्याच्या पुढील टप्प्यात शेतकरी पडताळणी केली जाते. त्यासाठी ‘फार्मर आयडी’ या रकान्यात आधारकार्ड(युआयडी) हा पर्याय आहे.

या पर्यायात आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर पुढील प्रक्रिया होत नाही. परिणामी पडताळणी होत नसल्याने ‘फेल्ड’ असा संदेश तेथे दाखवला जात आहे. ही समस्या शनिवार (दि.२२)पासून वारंवार येत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी केंद्रावर येऊनही परत गेले. शेतकऱ्यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा :

The post पीकविम्याला आधारचा अडसर, शेतकऱ्यांची होतेय मोठ्या प्रमाणात अडचण appeared first on पुढारी.