पुणे पोलिसांकडून सराफाची दोन दिवस चौकशी

ललित पाटील,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ड्रग्ज माफीया ललित पानपाटील-पाटील याच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी तीन किलो सोन्याच्या विटा जप्त केल्या आहेत. त्यामुळे ललितच्या संपर्कातील संशयितांनी ज्या सराफ व्यावसायिकाकडून सोने खरेदी केले त्याची पुणे पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. संशयितांनी सोने खरेदी कशा प्रकारे, केव्हा व कोठे केली तसेच आर्थिक व्यवहार कसे केले याबाबत पोलिस तपास करीत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

एमडी तयार करून त्याचा पुरवठा केल्याप्रकरणी ललित पानपाटीलसह इतर संशयितांविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यात पुणे पोलिसांनी ललितचा भाऊ भुषण पानपाटील व मित्र अभिषेक उर्फ जर्मन बलकवडे यास पकडले. पोलिस तपासात तीन किलो सोन्याच्या विटा सापडल्या. संशयितांनी ड्रग्ज विक्रीतून सोन्याचांदीत गुंतवणूक केल्याचे समोर आले. पुणे पोलिसांनी या प्रकरणात ललितसह इतर संशयितांच्या संपत्तीची चौकशी सुरु केली आहे. त्यानुसार संशयितांनी ज्या सराफ व्यावसायिकाकडून सोने-चांदी खरेदी केले त्याची देखील चौकशी केली आहे. त्यासाठी शहरातील एका सराफ व्यावसायिकास पुणे पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले. पुणे येथे त्या सराफ व्यावसायिकाची दोन दिवसांपासून कसून चौकशी केली जात आहे. संशयितांनी आर्थिक व्यवहार कसे केले, याचा पोलिस सखोल तपास करीत आहेत.

डोळ्यात भरणारी सराफ व्यावसायिकाची प्रगती

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित सराफ व्यावसायिक कुटूंब दहा वर्षांपूर्वी नाशिक शहरात स्थायिक झाले. त्यानंतर काही वर्षांतच सराफ व्यावसायिकाने पाच दुकाने घेतली, तसेच काही एकर बागायती शेती, आलिशान गाड्या आणि कोट्यावधींची संपत्तीची मालकी त्यांच्याकडे असल्याचे कळते. सराफी व्यवसायातील स्पर्धा लक्षात घेता, संबंधिताने साधलेली प्रगती डोळे विस्फारायला लावणारी असल्याची शहरात चर्चा आहे.

ललितच्या मैत्रीणीची नाशिकला चौकशी

पुणे पोलिसांनी अटक केलेल्या ॲड. प्रज्ञा कांबळे या ललितच्या मैत्रीणीला नाशिकला तिच्या निवासस्थानी आणल्याचे समजते. प्रज्ञा हिने ललितला गुन्ह्यांमध्ये कायदेशीर मदत केल्याचे तसेच त्याने दिलेल्या पैशांवर संपत्ती, वाहने खरेदी केल्याचे पोलिस तपासातून समोर येत आहे.

हेही वाचा :

The post पुणे पोलिसांकडून सराफाची दोन दिवस चौकशी appeared first on पुढारी.