पोलिस निरीक्षक अशोक नजन; जीवन संपवल्याचे कारण गुलदस्त्यात

पोलीस अधिकारी अशोक नजन pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक निवृत्ती नजन यांनी अंबड पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. २०) सकाळी साडेनऊ ते पावणेदहाच्या दरम्यान सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून जीवन संपवल्याची घटना घडली. या घटनेने शहर पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून, कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. अतिशय शांत स्वभावाचे अधिकारी म्हणून ते परिचित होते. तर यापूर्वी त्यांनी जळगाव जिल्ह्यासह नाशिकमधील कळवण तालुक्यात देखील काम केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक निवृत्ती नजन (४८, रा. गुरू गोविंदसिंग शाळेच्या मागे, इंदिरानगर) हे मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजता अंबड पोलिस ठाण्यातील कार्यालयात आले. त्यानंतर नजन यांनी पावणेदहाच्या दरम्यान स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून जीवन संपवले. दरम्यान, यावेळी पोलिस ठाण्याच्या आवारात अंमलदारांची हजेरी सुरू होती. त्यानंतर हवालदार शरद झोले हे हजेरीचा अहवाल देण्याकरिता नजन यांच्या कार्यालयात गेले असता त्यांना नजन यांच्याकडे बघून त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा, असे प्रथमदर्शनी वाटले. मात्र, नंतर त्यांच्या नाकातून रक्त येताना त्यांना दिसले. झोले यांनी तत्काळ पोलिस ठाण्याच्या आवारात पळत जाऊन इतर अंमलदारांना व कर्मचारी यांना आवाज देऊन नजन यांच्या कार्यालयात बोलावले. त्यानंतर सर्वांना नजन यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडल्याचे दिसून आले.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह शहरातील विविध पोलिस ठाण्यांतील निरीक्षकांनी अंबड पोलिस ठाण्यात धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर नजन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यांनी असे करण्यामागील कारणाचा तपास पोलिस घेत आहेत. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी पंचनामा करून त्यांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे. नजन यांनी त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे सहकारी-कर्मचारी यांचे मन जिंकले होते. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किरण शेवाळे करीत आहेत.

नजन यांच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार
नजन हे मूळचे वैजापूर येथील रहिवासी आहेत. ते १९९७ मध्ये उपनिरीक्षक पदावर पोलिस खात्यात कर्तव्यावर आले. जुलै २०२३ मध्ये त्यांची नियुक्ती अंबड पोलिस ठाणे येथे पोलिस निरीक्षक, गुन्हे या पदावर झाली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. मंगळवार (दि. २०) रोजी सायंकाळी बेलगाव, ता. वैजापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनेक प्रश्न अनुत्तरित
सोमवारी नजन यांनी रात्री उशिरापर्यंत शिवजयंतीचा चोख बंदोबस्त केला. त्यांच्या मनात रात्रीपासून आत्महत्येचा विचार होता का? एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आत्महत्या करण्यासारखे पाऊल उचलले तर त्यास कौटुंबिक कारण होते की त्यांना अन्य काही कोणाचा दबाव आला होता का? असे विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

अन् त्या गोळीने कपाटही फोडले
पोलिस निरीक्षक अशोक नजन यांनी आपल्या ज्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात जी गोळी झाडली. त्या गोळीचा वेग एवढा होता की, गोळी नजन यांच्या शेजारी असलेल्या लोखंडी कपाटाला लागून आत शिरली.

The post पोलिस निरीक्षक अशोक नजन; जीवन संपवल्याचे कारण गुलदस्त्यात appeared first on पुढारी.