बांधकाम कामगारांसाठी तालुकानिहाय भांडी वाटप केंद्र सुरु करण्याच्या सूचना

बांधकाम कामगार भांडी वाटप

धुळे : पुढारी वृत्तसेवा– महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना धुळे शहराजवळील वरखेडी-कुंडाणे रोडलगत असलेल्या गोदामातून गृहपयोगी वस्तूंचा संच म्हणजे भांड्यांचे वाटप करण्यात येत आहे. या भांडी वाटप केंद्रावर लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी होते. लाभार्थी तीन-तीन दिवस ठाण मांडून मुक्कामी बसत असतो. त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. म्हणून कामगार लाभार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी म्हणून तालुकानिहाय गृहपयोगी भांडी वाटप केंद्र सूरु करावे, या मागणीसाठी आ. कुणाल पाटील यांनी आज कामगार मंत्री ना. सुरेश खाडे यांच्याकडे केली होती. त्यानुसार तालुकानिहाय गृहपयोगी भांड्यांचे वाटप करण्याच्या सूचना बांधकाम कामगार विभागाचे सचिव विवेक कुंभार यांना दिल्या आहेत. त्यामुळे धुळे तालुक्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांची गैरसोय दूर होणार आहे.

नोंदणीकृत इमारत व इतर बांधकाम कामगारांंच्या सोयीसाठी गृहपायोगी भांडी वाटप केंद्र तालुकानिहाय सुरु करावे या मागणीसाठी आज दि. 29 फेब्रुवारी रोजी धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांनी कामगार मंत्री ना. सुरेश खाडे यांची भेट घेतली. यावेळी आ.कुणाल पाटील यांनी या मागणीचे पत्र कामगार मंत्र्यांना दिले. यावेळी कामगार मंत्री ना.खाडे यांच्याशी चर्चा करतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की, शासनाच्यावतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्याअनुषंगाने धुळे शहरालगत असलेल्या वरखेडी-कुंडाणे रोडलगत असलेल्या भांडी वाटप केंद्रातून नोंदणीकृत कामगांराना गृहपयोगी भांड्यांचा संचचे वाटप गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. या भांडी वाटप केंद्रावर लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी होत आहे. भांडी घेण्यासाठी तब्बल तीन-तीन दिवस लाभार्थी ठाण मांडून येथे मुक्कामी राहत आहे. गर्दी झाल्याने अनेकवेळा भांडे घेण्यासाठी रांगेत उभे राहतांना वादविवाद उदभवत आहेत. प्रचंड उसळलेली गर्दी आणि त्यातून निर्माण होणारे वादविवाद यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू शकतो. म्हणून तालुकानिहाय गृहपयोगी भांडी वाटप केंद्र सुरु करावे अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी केली आहे. दरम्यान या केंद्रावर लाभार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी व इतर मुलभूत सोयी सुविधा देण्यात याव्यात अशीही मागणी त्यांनी केली. तसेच इमारत व इतर बांधकाम कामगारांची धुळ्यातील जयहिंद महाविद्यालयाजवळील कार्यालयात कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळवून घेण्यासाठी नोंदणी करावी लागते. या ठिकाणीही प्रचंड गर्दी होत असून कामगारांना दिवसभर नोंदणीसाठी उभे रहावे लागते. तरीही अनेक कामगारांची नोंदणी होत नाही पुन्हा त्यांना दुसर्‍या दिवशी नोंदणीसाठी यावे लागते. त्यामुळे मंडळनिहाय नोंदणी कार्यालय सुरु करण्याचीही मागणी आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केली.

आ. कुणाल पाटील यांच्या मागणीनंतर कामगार मंत्री ना. सुरेश खाडे यांनी विवेक कुंभार,सचिव बांधकाम कामगार विभाग यांना तालुकानिहाय गृहपयोगी वस्तू म्हणजे भांडी वाटप केंद्र सुरु करण्याच्या तत्काळ सुचना दिल्या. त्यामुळे आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून इमारत व इतर बांधकाम कामगारांची गैरसोय दूर होणार आहे.

हेही वाचा :

The post बांधकाम कामगारांसाठी तालुकानिहाय भांडी वाटप केंद्र सुरु करण्याच्या सूचना appeared first on पुढारी.