बालसाहित्यातून उद्याचे युवक घडतात : शुभम देशमुख

बालसाहित्य मेळावा,www.pudhari.news

जळगाव पुढारी वृत्तसेवा ; बाल साहित्यातील कथा, कविता, कादंबऱ्या, एकांकिका, नाटिका या सर्वांमधून आपण नेहमी सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. उद्याच्या समाजाचा आधारस्तंभ असणाऱ्या युवकांची सदृढ मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न बालसाहित्यातून केला जातो, असे प्रतिपादन बालसाहित्यिक शुभम देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. कलाआनंद बाल मेळाव्याचे आज गुरुवार (दि. 1)  रोजी उद्घाटन करण्यात आले त्यावेळी तो बोलत होते.

तो पुढे म्हणाला की, बालसाहित्यातून उद्याचा युवक घडणार आहे. वयानुसार माणसाच्या जाणिवा हळूहळू प्रगल्भ होतात. त्याला मिळणाऱ्या अनुभवावर त्याचा विचारांचा पाया पक्का होत असतो. प्रत्येकाला समान अनुभव येतीलच असे नसते आणि आलेल्या अनुभवातून प्रत्येक जण सारखाच वैचारिक परिणाम, प्रतिसाद दाखवेल असेदेखील नसते. अशावेळी येणाऱ्या बऱ्या-वाईट अनुभवातून नेहमी सकारात्मक विचार पुढे यावा आणि सुदृढ मानसिकतेची बांधणी व्हावी हे महत्त्वाचे असते.

याप्रसंगी व्यासपीठावर बालसाहित्यकार बालमेळावा समन्वयक एकनाथ आव्हाड, माया धुप्पड, अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. उषा तांबे, बालअध्यक्ष शुभम सतीश देशमुख (चाळीसगाव), उद्घाटक पियुषा जाधव (जळगाव), स्वागताध्यक्ष्ा दीक्षा राजरत्न सरदार, साने गुरुजींच्या पुतनी सुधाताई साने, मदत व पुर्नवसनमंत्री अनिल पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेंहदळे, कार्याध्यक्ष्ा प्रा. डॉ. अविनाश जोशी आदी उपस्थित होते.

कलाआनंद मेळाव्याच्या उद्घाटन समारंभात 97 व्या साहित्य संमेलनानिमित्ताने साने गुरुजी विद्यालयाच्या 97 विद्यार्थ्यांनी ‌‘खरा तो एकच धर्म’ ही पूज्य साने गुरुजी यांची कविता सादर केली. यावेळी त्यांना केतन जोशी यांनी तबल्यावर, योगेश पाटील यांनी बासरीवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी साथसंगत केली.

गोविंदा आला रे… 

उद्घाटनानंतर सुविचार हंडी फोडण्यात आली. हंडी फोडण्याआधी विद्यार्थ्यांनी ‌‘गोविदा आला रे आला…’ या गाण्यावर नृत्य सादर केले. या गाण्यावर प्रेक्ष्ाकांनी ठेका धरला होता. ही हंडी वेदांत पाटील याने फोडली. या सुविचार हंडीत खानदेशातील शाळांमधून सुविचार मागविण्यात आले होते. हंडी फुटल्यानंतर हे सुविचार लिहिलेल्या चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले.

सूत्रसंचालन नेहा शिवाजी पाटील, भाविका सुरेश वाल्हे यांनी केले. भार्गवी प्रमोद नालंदे यांनी प्रा. उषा तांबे यांचा परिचय करून दिला. दिव्याणी रूपेश साळुंखे यांनी एकनाथ आव्हाड यांचा परिचय करून दिला. आभार कृष्णा पवार यांनी मानले.
बालमेळाव्याचे मुख्य समन्वयक एकनाथ आव्हाड प्रास्ताविकात म्हणाले, की हा बालमेळावा मुलामुलांना जोडण्याचे काम करेल, मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढवेल व विविध बालसाहित्य प्रकारांचे दर्शन घडवेल. स्वागताध्यक्ष दीक्षा सरदार यांनी आपल्या भाषणात बालमेळाव्यातील कलाकारातूनच उद्याचे यशस्वी कलाकार निर्माण होणार आहेत, असे मत व्यक्त केले. आजच्या विद्यार्थ्यांनी या वयात साहित्यिकांची व साहित्याची ओळख झाली तर भविष्यातील सुजाण नागरिक तयार होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.
बालमेळाव्याचे उद्घाटन पियुषा गिरीश जाधव यांनी केले. त्यांनी साहित्यातील ग्रंथांमध्ये डोकवतांना स्वत:मध्ये डोकावण्याची प्रेरणा मिळते. एकदा स्वत:ला गवसलो की, जगण्याचे अन्वयार्थ आपोआप उमगतात. जगण्याचे अन्वयार्थ उमगले की जगायचं कसं हा प्रश्नच उद्भवत नसल्याचे तिने सांगितले. नांदेडच्या बिलोली आंतरभारती शिक्षण संस्थेचे 50 विद्यार्थी व शिक्षक खास या बालसंमेलनासाठी हजर झाले.

हेही वाचा :

 

The post बालसाहित्यातून उद्याचे युवक घडतात : शुभम देशमुख appeared first on पुढारी.