ब्रेकअप केल्याचा राग, प्रेयसीने मोडलं प्रियकराचं ठरलेलं लग्न

विवाह

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- प्रियकराने ‘ब्रेकअप’ केल्याचा राग आल्याने एका तरुणीने प्रियकरासह तिच्या बहिणीचे फोटो मॉर्फ करून त्यांच्या नातलगांमध्ये व्हायरल केले. त्यामुळे प्रियकराचे ठरलेले लग्न मोडले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रियकराच्या वडिलांनी सायबर पोलिस ठाण्यात तरुणीविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

पंचवटीतील रहिवासी असलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मुलाची व मुलीची संशयित तरुणीने बदनामी केली. पीडित मुलगा आणि त्याची प्रेयसी एकमेकांच्या ओळखीतील असून, ते पंचवटीत एकाच परिसरातच राहतात. मुलगा सध्या परराज्यात कामाला असून, ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सन २०२१ पासून त्यांचे प्रेमसंबंध होते, मात्र, काही कारणांनी त्यांच्यातील प्रेमसंबंध संपले. याचा राग आल्याने संशयित तरुणीने बनावट मेल आयडीद्वारे प्रियकराचे व्हॉट्सअप व फेसबुक प्रोफाइल बनविले. तर, प्रियकराच्या बहिणीच्या नावे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले. या खात्यांवरून चॅटिंग व विविध स्टेटसद्वारे प्रियकराच्या बहिणीचा व इतर नातेवाइंकाचा एका कार्यक्रमातील फोटो घेतला. त्या फोटोतील चेहरा मॉर्फ करून अश्लील फोटो तयार करून ते व्हायरल केले. यामुळे पीडित मुलासह त्याच्या बहिणीची व कुटुंबीयांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. ९ फेब्रुवारीपासून तरुणीने हे कृत्य केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. त्यामुळे पीडित मुलाच्या ६५ वर्षीय वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित प्रेयसीच्या अशा कृत्यामुळे मुलाचे दोनदा लग्न मोडल्याचा आरोप पित्याने केला आहे.

दोनदा विघ्न

ब्रेकअपनंतर मुलाच्या कुटुंबाने त्याच्या विवाहासाठी वधूचा शोध घेतला. त्यानुसार पसंती झाल्यावर लग्न ठरले. मात्र, संशयित तरुणीच्या कृत्यामुळे नियोजित वधूच्या कुटुंबीयांनी विवाह मोडला. त्यानंतर दुसरी मुलगी पसंत केली असता तोही विवाह मोडला. त्यामुळे संशयित तरुणीनेच हा प्रकार करून बदनामी करत मुलाचे लग्न मोडल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे.

सत्यता पडताळणी करू

हा गुन्हा तांत्रिक स्वरूपाचा आहे. पुरावे संकलन बाकी असून, तपासात जे पुरावे मिळतील, त्यानुसार संबंधितांची चौकशी होईल. तांत्रिक पुरावे मिळविण्यासाठी संबंधित सोशल मीडिया कंपनीकडे पाठपुरावा केला आहे. याआधीही पंचवटी पोलिस ठाण्यात दोघांच्या संबंधाने तक्रार दाखल आहे. सुरेश कोरबू, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर पाेलिस ठाणे.

हेही वाचा :

The post ब्रेकअप केल्याचा राग, प्रेयसीने मोडलं प्रियकराचं ठरलेलं लग्न appeared first on पुढारी.