भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, ठाकरे गटात इच्छुकांची भाऊगर्दी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना www.pudhari.news

नाशिक : सतीश डोंगरे

एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये सध्या मनसेचा फारसा बोलबाला नसल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जवळपास सर्वच पक्षांनी दंड थोपाटले असले, तरी मनसेच्या गोटात कमालीची शांतता दिसून येत आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या मनसेकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अद्यापपर्यंत एकाही इच्छुकाचे नाव समोर आलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले असून, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी आदी पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची सध्या चर्चा रंगत आहे. भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असून, पाठोपाठ राष्ट्रवादीकडून अनेक नावे समोर येत आहेत. शिवसेना शिंदे अन् ठाकरे गटाकडून तूर्तास प्रत्येकी एकाच इच्छुकाचे नाव समोर येत असले, तरी अनेकांची लोकसभा निवडणूक लढविण्याची मनीषा आहे. या सर्वांमध्ये मात्र मनसे कुठेही नसल्याचे दिसून येत आहे. २००९ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविताना मनसे उमेदवाराने विजयी उमेदवारास चांगलाच घाम फोडला होता. मनसेकडून हेमंत गोडसे यांनी तब्बल दोन लाख १६ हजार ४७४ मते मिळविली होती, तर राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांनी दोन लाख ३८ हजार ७०६ मते मिळवत अवघ्या २२ हजार ३२ मतांनी विजय मिळवला होता. मनसेच्या या दमदार कामगिरीच्या बळावर मनसेला २००९ च्या विधानसभा निवडणुकीत अधिकृत रेल्वे इंजीन हे निवडणूक चिन्ह प्राप्त झाले होते. पुढे शहरात मनसेचे तीन आमदार निवडून आले. शिवाय महापालिकेत ३९ नगरसेवकांसह सत्ता प्राप्त केली.

नंतरच्या काळात मात्र मनसेला उतरती कळा आली. परिणामी सद्यस्थितीत मनसेची अजिबातच हवा दिसून येत नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये मनसेची भूमिका काय असेल? की २०१९ प्रमाणेच मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला जाईल, यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दुसरीकडे मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी अचानकच आपल्या पदाचा राजीनामा देत धक्कातंत्र अवलंबल्याने मनसेतील अंतर्गत धुसफूस यानिमित्त चर्चिली गेली. अशात आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे कुठे असेल, हे तूर्तास तरी दिसून येत नसल्याचे चित्र आहे.

उमेदवार कोण?

२००९ मध्ये मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवणारे हेमंत गोडसे हे शिवसेनेत दाखल होत खासदार झाले. आता ते शिवसेना शिंदे गटात असून, सलग दुसरी टर्म खासदार आहेत, तर २०१४ मध्ये मनसेकडून लोकसभा निवडणूक लढविणारे डॉ. प्रदीप पवार सध्या पक्षात फारसे सक्रिय नसल्याचे दिसून येत आहे. अशात मनसेने आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार केल्यास, त्यांचा उमेदवार कोण असाही प्रश्न यानिमित्त उपस्थित केला जात आहे.

आगामी लोकसभेसाठी मनसेकडून प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम आणि मी स्वत: इच्छुक आहे. मात्र, आमचे प्रथम लक्ष महापालिका निवडणूक असून, पुन्हा एकदा महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकवायचा आहे. महापालिका निवडणुकीअगोदर लोकसभा निवडणूक घेतल्यास, नाशिक लाेकसभा मतदारसंघात मनसेचा खासदार असेल. सध्या त्यादृष्टीने काम सुरू आहे. – दिलीप दातीर, शहराध्यक्ष, मनसे.

The post भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, ठाकरे गटात इच्छुकांची भाऊगर्दी appeared first on पुढारी.