भुजबळांना आलेल्या धमकीची दखल घेण्यासाठी सरकार सक्षम

चंद्रकांत पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारी घटना चिंताजनकच असल्याची कबुली देत राज्य सरकार त्याबाबत सर्तक असल्याचा दावा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. अन्न, नागरी व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना आलेल्या धमकीबाबत दखल घेण्यासाठी सरकार सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या ना. पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राज्यात सुरु असलेल्या गोळीबाराच्या सत्रावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात घडणाऱ्या घटना चिंताजनक आहेत. त्याची योग्य स्तरावर चौकशी आणि कारवाई होते आहे, असे पाटील म्हणाले. भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवून ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याची माहिती दिली आहे. यावरही पाटील यांनी भाष्य केले. राज्यात सध्या जे चाललेय ते अनाकलनीय आहे. कुठे तरी शांतपणे सर्व पक्षांनी त्याचा विचार करणे आवश्यक आहे. भुजबळ यांना आलेल्या धमकीची दखल घेण्याकरिता सरकार सक्षम आहे, असेही त्यांनी सांगितले.

अपुऱ्या माहितीवर बोलणे योग्य नाही

चाळीसगाव गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महिंद्र मोरे यांचा मृत्यू झाला. यावर अपुऱ्या माहितीवर बोलणे योग्य नाही, असे ते म्हणाले. मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या निर्णयावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. परभणीला एका मुलीने आत्महत्या केली होती आणि चिठ्ठीत लिहिले होते की पैसे नाही शिक्षणासाठी. त्यामुळे संवेदनशील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे. सर्व जात, पंथ, धर्मच्या मुली आता शिक्षण घेऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

वागळेंनी नीट बोलावे

वरिष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्या गाडीवर शुक्रवारी रात्री पुण्यात हल्ला करण्यात आला. यावर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानांबाबत इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलले तर त्यांच्यावर श्रद्धा असलेल्या माणसांकडून प्रतिक्रिया उमटणे हे स्वाभाविक आहे. हा संताप लक्षात घेऊन वागळेंनी नीट बोलावे, बोलण्याचा पण काही स्तर आहे, पद्धत आहे, असे पाटील यांनी सांगितले.

जरांगेंनी उपोषणाला बसण्याची आवश्यकता नाही

मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या मुद्यावरही पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, जरांगेंचा कुणबी नोंदीचा मुद्दा मार्गी लागला आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर मागासवर्ग आयोग काम करते आहे. त्यामुळे जरांगे यांनी आता उपोषणाला बसण्याची आवश्यकता वाटत नाही.

हेही वाचा :

The post भुजबळांना आलेल्या धमकीची दखल घेण्यासाठी सरकार सक्षम appeared first on पुढारी.