भ्रष्टाचाराचे दर्जेदार ‘शिक्षण’; अधिकारीच करताय भक्षण

lach www.pudhari.news

नाशिक: सतीश डोंगरे

शिक्षणाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा पाया पक्का होतो, असे म्हटले जाते. मात्र, गोरगरिबांची मुले ज्या महापालिकांच्या शाळांमध्ये शिकतात, त्या शाळांचा कारभार पाहणारेच भ्रष्टाचारात आपला पाय खोलवर बुडवून बसले असतील तर त्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल, अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे साहसाचेच ठरेल. महापालिकेच्या शिक्षणविभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांना लाच घेताना पकडल्यानंतर शिक्षण विभागाची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. धनगर या विभागाच्या पहिल्याच भ्रष्ट अधिकारी नाहीत; सेवानिवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक असतानाही ‘धन’ गोळा करण्याची लालसा कमी झाली नाही. त्यांच्याकडे सापडलेले घबाड बघता आतापर्यंतच्या सेवाकाळात कोट्यवधींची ‘माया’ जमविणे हाच एकमेव हेतू त्यांच्या सेवेचा असावा असे दिसून येते.

अगोदरच महापालिका शाळांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. त्यात येथील ‘शिक्षणाची गुणवत्ता’ यावर प्रकर्षाने दरवेळी चर्चा रंगते. ही चर्चा खोडून काढण्यात महापालिकेच्या शिक्षण विभागाला अद्यापपर्यंत यश आलेले नाही. उलट महापालिकांच्या शाळा कशा निरुपयोगी आहेत, ही बाब दिवसागणिक घट्ट होताना दिसते. आता तर या शाळांना विद्यार्थी मिळणे अवघड होत आहे. याचा अर्थ गरिबांना या शाळांची गरज नाही? असा होत नसून, येथील भ्रष्ट कारभार आता सर्वांनाच नकोसा होत आहे. शाळा विकासाच्या नावे नाशिककरांकडून गोळा झालेला कररुपी निधी मंजूर करायचा अन् अधिकारी-ठेकेदारांनी तो वाटून घ्यायचा हा प्रकार वर्षानुवर्षापासून सर्रासपणे सुरू आहे. निधीचा पैसा कमी पडतो म्हणून की काय, शिक्षक-मुख्याध्यापकांसह संस्थाचालकांकडून लाखो रुपयांची माया गोळा करण्याचाही सपाटा कायम आहे. सुनीता धनगर यांचा हाच फार्म्युला असल्याचे त्यांच्याकडे सापडलेल्या घबाडावरून स्पष्ट होते. ८५ लाख रोकड, ३२ तोळे सोने, दोन फ्लॅट (अंदाजे तीन कोटी), प्लॉट (आडगाव परिसरात), बँक लॉकरमध्ये लाखो रुपये इतकी माया त्यांच्याकडे आतापर्यंत सापडून आली आहे. पोलीस तपासाच्या दुसऱ्याच दिवशी एवढे मोठे घबाड सापडून आल्याने, आणखी किती ‘माया’ गोळा केलेली असेल या विचाराने पोलीस चक्रावले नसतील तरच नवल.

खरं तर सुनीता धनगर यांच्यावर यापूर्वीही भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले. मात्र, धनगर यांना प्रत्येकवेळी अभय मिळत गेले. गतवर्षी महापालिकेच्या अंदाजपत्रकात शाळा दुरुस्तीसाठी १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, यंदा तो पाच कोटींवरच आणल्याने, मनपा प्रशासनाची ही कृती बरेच काही सांगून जाते. पाच कोटींच्या निधीवरून धनगर यांनी बरीच आदळआपट केल्याचीही माहिती समोर येत आहे. मात्र, प्रशासनाने त्यास दाद न दिल्याने, नाशिककरांच्या कष्टाचे काही पैसे वाचले असे म्हटले तर नवल ठरू नये. या देशाचा भावी नागरिक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि कर्तव्याप्रती जबाबदार घडविण्याचे उत्तरदायित्व ज्या शिक्षण क्षेत्रावर आहे, तेच क्षेत्र जर भ्रष्टाचाराने बरबटलेले असेल आणि या क्षेत्रातल्या बहुतांश विभागात अनागोंदी माजली असेल तर या देशाचे भवितव्य काय? हे सांगण्यासाठी कुणा तज्ज्ञाची वा भविष्यवेत्त्याची गरज नाही. एखादवेळी महसूल विभागावरही ताण पडेल एवढा प्रचंड भ्रष्टाचार आज शिक्षण क्षेत्रात असल्याचे सुनीता धनगर यांच्या भ्रष्ट कारभारावरून अधोरेखित झाले आहे.

– प्रासंगिक – सतीश डोंगरे

The post भ्रष्टाचाराचे दर्जेदार ‘शिक्षण’; अधिकारीच करताय भक्षण appeared first on पुढारी.