मखमलाबादला अतिक्रमण काढताना तणाव

अतिक्रमण काढताना तणाव,www.pudhari.news

नाशिक पंचवटी : पुढारी वृत्तसेवा; मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल ते शिंदेनगर येथील रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणाविरोधात महापालिकेला ऑनलाइन तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत अतिक्रमण निर्मूलन विभागाने पोलिस फौजफाट्यासमवेत कारवाई केली. मात्र हा ताफा जॉगिंग ट्रॅकजवळ जाताच प्रभागातील माजी नगरसेविकेच्या पतीने अतिक्रमण हटविण्यास विरोध केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समोपचाराची भूमिका घेतल्याने वाद मिटला. मात्र अतिक्रमण निर्मूलन विभागास तेथून काढता पाय घ्यावा लागला.

मखमलाबाद रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे व्यवसाय सुरू असल्याने अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मनपाचे प्रभारी अतिक्रमण निर्मूलन उपायुक्त नितीन नेर यांच्या आदेशान्वये आणि पंचवटी प्रभारी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली मखमलाबाद रस्त्यावरील विक्रेत्यांवर कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले. या मोहिमेत निरीक्षक प्रवीण मोरे, श्याम ठाकरे, उमेश खैरे, अतुल जाधव आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

पंचवटी परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला व्यावसायिक आणि फळ विक्रेत्यांनी ठाण मांडल्याचे दिसून येते. त्यामुळेदेखील वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची असाही प्रश्न यानिमित्ताने पडतो. त्यामुळे या संपूर्ण परिसरात अतिक्रमण निर्मूलन विभागाने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

आमदारांचा फोन अन् कर्मचाऱ्यांचा काढता पाय

माजी नगरसेविकेच्या पतीने अतिक्रमण हटविण्यास विरोध करत जप्त केलेले साहित्य परत करा त्याशिवाय येथून गाडी काढू देणार नाही. तसेच तुम्हाला अतिक्रमण कोणी काढायला सांगितले? तुम्ही कारवाई करत असलेली जागा मनपाची नाही, तर तुम्ही कारवाई कशी करता असा जाब विचारला. कर्मचारी ऐकत नसल्याचे लक्षात येताच, त्यांनी मतदारसंघातील आमदारास कॉल करत कर्मचाऱ्यांशी बोलणे करून दिले. आमदारांनी दम भरताच कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला व जप्त केलेले काही साहित्य जागेवरच परत केले.

हस्तक्षेप झाल्यास कशी होणार कारवाई?

अधिकारी नेर यांना अतिक्रमण काढू नये यासाठी धमकी देण्यात आल्याचे प्रकरण ताजे आहे. अशातच अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू असताना कारवाई करू नये, जमा केलेले साहित्य ताबडतोब परत केल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नसल्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतल्यास, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम तरी कसे करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा :

The post मखमलाबादला अतिक्रमण काढताना तणाव appeared first on पुढारी.