Nashik MLA : अवकाळीग्रस्तांना भरपाईसाठी सर्वपक्षीय वज्रमूठ!

अवकाळी मदत सर्वपक्षीय एकजुठ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला गुरूवार (दि. ७)पासून प्रारंभ होत आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात कोसळलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने जिल्ह्यातील सुमारे ३३ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांची एकजूट या अधिवेशनाच्या निमित्ताने दिसून येणार आहे. यासह मराठा आरक्षण, आगामी सिंहस्थ कुंभमेळा, नाशिक-पुणे रेल्वे, निओ मेट्रो, आयटी पार्क, लॉजिस्टीक पार्क, गोदाआरती, औद्योगिक वसाहतींचे भूसंपादन, एम.डी.प्रकरण, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र, आदी प्रश्नांवर नाशिकच्या आमदारांकडून (Nashik MLA)  अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. त्यामुळे या अधिवेशनाकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

—-

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून त्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी आपले प्रयत्न आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विधिमंडळात आवाज उठविला जाईल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आतापासूनच सुरूवात करणे आवश्यक असल्याने सिंहस्थासाठी भरीव निधी मिळावा यासाठी शासनाकडे मागणी केली जाईल. आयटी पार्क, लॉजिस्टीक पार्क, नाशिक-पुणे रेल्वे, गोदाआरती आदी प्रश्नांवर या अधिवेशनात चर्चा केली जाईल. – अॅड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व.

—-

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकला भरीव निधी मिळावा यासाठी आपण विधीमंडळात प्रश्न उपस्थित करणार आहोत. सिंहस्थाची तयारी आतापासूनच सुरू व्हायला हवी, यासाठी शासनाने सिंहस्थ समन्वय समिती गठीत करायला हवी, अशी मागणी अधिवेशनात केली जाईल. रोजगार निर्मितीसाठी नाशिकला आयटीपार्कसारखे प्रकल्प व्हावेत. तसेच औद्योगिक क्षेत्रांच्या विकासाकडे विधीमंडळाचे लक्ष वेधले जाईल. नाशिकच्या प्रलंबित प्रश्नांची चर्चा घडवून आणली जाईल. – प्रा. देवयानी फरांदे, आमदार, नाशिक मध्य.

—-

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी प्रमुख मागणी आहे. यासाठी अधिवेशनात आवाज उठविला जाईल. सिडकोतील घरे फ्री होल्ड करण्यासंदर्भातील प्रश्न गेल्या अनेक वर्षांपांसून प्रलंबित आहे. त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. सिडकोच्या घरांना एफएसआय वाढवून मिळण्याची मागणी केली जाईल. मतदारसंघातील गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड व्हावा यासाठी अंबड पोलीस ठाण्याच्या विभाजनाचा मुद्दा मांडला जाईल. औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा केला जाईल. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्यस्तरीय समितीचे गठण होण्यासाठी विधीमंडळात प्रश्न मांडले जाईल. – सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम

—-

धार्मिक, सुसंस्कृत आणि सिंहस्थ भूमी असलेल्या नाशिकची एम.डी. प्रकरणाने देशभरात नाचक्की झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अधिवेशनात केली जाणार आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यांना भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न या अधिवेशनाच्या माध्यमातून केला जाईल. स्मार्ट सिटी अभियानात नाशिकची निवड झाली असली तरी प्रत्यक्ष स्मार्टनेस कामांमध्ये दिसत नसल्यामुळे त्याविरोधातही आवाज उठविला जाईल. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रलंबित प्रश्नावरही चर्चा केली जाईल. – सरोज अहिरे, आमदार, देवळाली.

——

संपूर्ण नादंगाव तालुका दुष्काळी घोषित करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी या अधिवेशनात केली जाणार आहे. तालुक्यातील शेतकारी, जनतेला दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. मतदारसंघात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तो मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांसाठी अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी या अधिवेशनात प्रश्न मांडले जातील. राज्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देखील आवाज उठविला जाईल. – सुहास कांदे, आमदार, नांदगाव.

…….

चांदवड तालुक्यात २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने काढणीला आलेल्या कांदा, द्राक्ष, डाळिंबसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने भरपाई द्यावी, यासह चांदवड व देवळा तालुक्यातील प्रलंबित पाण्याबाबत प्रश्न मांडणार आहे. दोन्ही तालुक्यातील तलाठी व ग्रामसेवक यांची रिक्त असलेली पदे त्वरित भरण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात रिक्तपदे आहेत. या रिक्तपदांमुळे सर्वसामान्य रुग्णांवर उपचार होत नाही, यासाठी आरोग्य विभागातील रिक्तपदे भरण्यात यावी व जलजीवन मिशनच्या वाढीव कामांसाठी व अडचणीबाबत हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहे. डॉ. राहुल आहेर,आमदार, देवळा-चांदवड

……..

इगतपुरी- त्र्यंबकेश्वर मतदारसंघात अवकाळी पावसाने भातासह बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबाबत नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून प्रयत्न करणार आहे. तसेच पावसाळ्यात इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात भरपूर पाऊस पडूनही उन्हाळ्यात वाड्या- पाड्यातील नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे येथील आदिवासी बांधव रोजगाराच्या शोधात गुजरात राज्यात निघून जातात. म्हणून प्रत्येक वाड्या-पाड्यातील गावांमध्ये तलावनिर्मितीसाठी शासनाने निधी द्यावा, अशी मागणी करणार आहे. – हिरामण खोसकर, आमदार, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर

…………
अवकाळीने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने विम्याची रक्कम तत्काळ मिळण्यासह स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत द्राक्षपिकाच्या समावेशासाठी प्रयत्नशील आहे. तसेच सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना जास्त मोबदला मिळावा. तालुक्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्गाची दुरुस्ती, नांदूरमध्यमेश्वर पर्यटन विकासासाठी निधी व आदिवासी वसतिगृह इमारत, निफाड पं. स. इमारतीचे विस्तारीकरण आदी विविध विकासकामांसाठी विधिमंडळात आवाज उठविणार आहे. -आमदार दिलीप बनकर, निफाड

……………….

जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले, त्यातून कळवण तालुकाही सुटला नाही. प्रशासकीय प्राथमिक अहवालानुसार ७७३ हेक्टरवरील पिकं पाण्यात गेलीत. सातत्याने अस्मानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना भरीव मदतीची नितांत आवश्यकता असल्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येईल. शेतकरी पुन्हा कसा उभा राहील, यादृष्टीने निर्णय घेतले जातील. कळवण – सुरगाणा मतदारसंघातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, त्यांच्या दुरुस्तीसह विकासासाठी निधीची गरज आहे. कृषिक्षेत्र आणि पर्यटनात कळवण अग्रेसर होतोय. तेव्हा दर्जेदार रस्त्यांचे जाळे विणण्याची निकड शासन दरबारी मांडली जाईल. भारतातील ५१ शक्तिपीठांमधील स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर वर्षागणित भाविकांची मांदियाळी वाढतेय. चैत्रात गडावर पाणीटंचाई जाणवते. तेव्हा या ठिकाणी शाश्वत विकासकाम साधून भाविकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन तसेच इतर माध्यमातून भरीव निधी मिळविण्याचा प्रयत्न असेल. नितीन पवार, आमदार, कळवण

……………
महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्ला साल्हेर परिसरात १५४ कोटी रुपयांच्या शिवसृष्टीचा प्रस्ताव शिखर समितीकडे सादर करून लवकरात लवकर काम सुरू होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. हरणबारी उजवा कालव्याच्या सुरुवातीच्या २५ किलोमीटरचे विस्तारीकरण व एक्स्प्रेस करण्यासाठी अंदाजपत्रक व प्रस्ताव दाखल असून, १८ कोटींचे हे काम मंजूर करण्यासाठी तसेच पारनेर सातमानेपर्यंतचे पुढील ४४ कोटी रुपयांचे काम मंजूर होण्यासाठी पाठपुरावा करणार. सोबतच मोसम नदीवरील सेकंड क्लास बंधाऱ्यांच्या नूतनीकरणाच्या ११ कोटींच्या कामास लवकरात लवकर मंजुरी मिळावी, सटाणा शहरात उड्डाणपूल साकारणे आदींसाठी अधिवेशन काळात पाठपुरावा करणार आहे. – आमदार दिलीप बोरसे, बागलाण.

………….

मालेगाव पॉवर सप्लाय कंपनी या खासगी वीज कंपनीने चालविलेल्या मनमानी कारभाराला चाप लावण्याची गरज आहे. गुन्हेगारीवर पोलिस प्रशासनाचा वचक राहिला नसून शहरात नशेसाठी वापरली जाणारी कुत्तागोली, गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. तसेच शहरातील धान्य पुरवठा विभागात काही पिवळ्या शिधापत्रिकाधारकांची नावे ऑनलाइन डिलिट झाली असून, सामान्य नागरिकांना नवीन तसेच जुने व जीर्ण झालेल्या शिधापत्रिका नवीन मिळविण्यासाठी होणारा त्रास व या ठिकाणी एजंटांमार्फत होणारा कारभार हे मुद्दे प्रामुख्याने मांडणार आहोत. – मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, आ. मालेगाव मध्य

हेही वाचा :

The post Nashik MLA : अवकाळीग्रस्तांना भरपाईसाठी सर्वपक्षीय वज्रमूठ! appeared first on पुढारी.