सोन्याला विक्रमी झळाळी : दर ६४ हजार पार, चांदीही चमकली

सोने चांदी दर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदी (Gold Rate)  दरात बघावयास मिळत असलेली तेजी विक्रमी स्तरापर्यंत पोहोचली आहे. सोन्याच्या दरांनी ६४ हजारांचा दर पार केला असून, तो अधिक वधारण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे. चांदीनेदेखील चमक दाखविली असून, दर ८० हजारांच्या पार गेला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी (दि.४) दराने विक्रमी उच्चांक गाठला. सोन्याच्या दर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेटसाठी ६४ हजार २३० रुपये नोंदविला गेला. तर २२ कॅरेट प्रति १० ग्रॅमसाठी ५८ हजार ८८ रुपये इतका नोंदविला गेला. मंगळवारी (दि.५) मात्र, दरात काहीशी घसरण झाल्याचे दिसून आले. २४ कॅरेट सोन्याच्या दरात ११३ रुपये, तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात १०० रुपयांची घसरण झाली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीचे वाढते दर लक्षात घेता, पुढील काळात दरात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. (Gold Rate)

लग्नसराईत दरवाढीची डोकेदुखी

फेस्टीव्हल सिजननंतर लग्नसराई सुरू झाल्याने, सराफ बाजारातील ग्राहकांची गर्दी कायम असल्याचे दिसून येत आहे. मात्र, दरवाढीमुळे वधु आणि वर पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. अनेकांनी दसरा, दिवाळी काळात सोने खरेदी करून ठेवले होते. मात्र, आता सोने खरेदी करणाऱ्यांना दरवाढीचा सामना करावा लागत आहे. (Gold Rate)

चांदी ८० हजाराच्या पार

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. चांदी ८० हजारांच्या पार गेली आहे. सोमवारी चांदीचा दर प्रति किलोसाठी ८० हजार पाचशे रुपये इतका नोंदविला गेला. मंगळवारी त्यात दोन हजारांची घसरण झाल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसात चांदीतील गुंतवणूक वाढली असून, वाढते दर गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येत आहे.

सोन्या-चांदीचे दर वाढत असले तरी, हीच गुंतवणुकीची योग्य वेळ आहे. कारण पुढील काळात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान वाढत्या दरांमुूळे गुंतवणूक म्हणून बघणाऱ्या ग्राहकांची संख्या काहीशी कमी झाली आहे. मात्र, नियमित ग्राहकांवर फारसा परिणाम झाला नाही.

– गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन

हेही वाचा :

The post सोन्याला विक्रमी झळाळी : दर ६४ हजार पार, चांदीही चमकली appeared first on पुढारी.