मानवी चुका, सरकारच्या बेपर्वाईमुळे रुग्णांचे मृत्यू : दानवे

अंबादास दानवे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मृत्यू भयावह आहेत. मानवी चुका तसेच सरकारच्या बेपर्वाईमुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. सरकारने एक रुपयाचीही औषध खरेदी केली नसून औषध खरेदीस निधी दिला नाही. तसेच समृद्धी महामार्गावर प्रादेशिक परिवहन विभागाची वाटमारी सुरू असल्याचाही आरोप दानवेंनी केला.

नांदेड येथील जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या औषधांच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्यानंतर शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालयातील रुग्णांचा, उपचाराचा व औषध साठ्याचा आढावा त्यांनी घेतला. त्यांनी सांगितले की, मागील व चालू आर्थिक वर्षात सरकारने एक रुपयाचीही औषध खरेदी केलेली नाही. हाफकीन या औषध पुरवठा कंपनीस १०६ कोटी रुपयांऐवजी फक्त ५० कोटी रुपये दिले आहेत. शासकीय निधीही वापरला नसून रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितले जातात. याबाबत सरकारची अनास्था असून ‘शासन आपल्या दारी’ ऐवजी ‘मृत्यू घरोघरी’ असे काम करताय की काय, अशी शंका दानवे यांनी उपस्थित केली. कांदा-टोमॅटोच्या बाबतही सरकारची बोटचेपी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला.

समृद्धीवर ‘आरटीओ’ची वाटमारी

समृद्धी महामार्गावरील अपघात आरटीओच्या चुकीमुळे झाला आहे. टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये १७ ऐवजी ३५ प्रवासी कसे बसले याची पाहणी महामार्गाच्या सुरुवातीस का केली नाही. संबंधित पोलिस अधीक्षकांनी घटना दाबण्याचा प्रयत्न केला. आरटीओच्या दोघांना निलंबित केले असून, चौकशी सुरू आहे. मात्र समृद्धी महामार्गावर आरटीओची वाटमारी सुरू आहे. त्याबाबतचे पुरावेही आहेत. हा अपघात नसून आरटीओने मुडदा पाडल्याचा आरोप दानवेंनी केला आहे.

‘एमडी’चा सखोल तपास व्हावा

या आधी अफू, गांजाच्या शेती उघडकीस यायच्या. आता एमडी बनवण्याचे कारखानेच समोर आल्याने त्यास कोणाचा आशीर्वाद आहे हे तपासावे लागेल. ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी. यात राजकीय लागेबांधे आहे का तेदेखील तपासावे. नाशिक पोलिसांना कारखान्याची माहिती नसल्याने ते झोपले होते का?, पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करावी.

– अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

आरक्षणाची सरकारने गंभीर दखल घ्यावी

मराठा आरक्षणाबाबत सरकारने ४० दिवसांचे आश्वासन दिले आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदाेलनाची दखल घेतली की नाही, तसेच सरकार त्यांचे आश्वासन पाळते की नाही, हे येत्या काही दिवसांत समजेल. मात्र सरकारने आरक्षणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी दानवे यांनी केली.

हेही वाचा :

The post मानवी चुका, सरकारच्या बेपर्वाईमुळे रुग्णांचे मृत्यू : दानवे appeared first on पुढारी.