मान्सूनचे कोकणात आगमन, नाशिककरांवरील पाणीकपात टळणार?

नाशिक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

हवामान खात्याने यंदा मान्सून लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने, नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट निर्माण झाले होते. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने त्याबाबतची तयारी करताना जलसंपदा विभागाकडून अतिरिक्त तीनशे दलघफू पाणी मंजूर केले होते. मात्र, मोसमी वाऱ्यांचे कोकण किनारपट्टीवर आगमन झाल्याने मान्सून मुंबई, नाशिकसह महाराष्ट्रात केव्हाही बरसण्याची शक्यता असल्याने नाशिककरांवरील संभाव्य पाणीकपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे. मात्र, अशातही नाशिककरांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

‘अल निनो’च्या संकटामुळे हवामान खात्याने यंदा मान्सून लांबणीवर पडणार असल्याचे संकेत दिले होते. यंदा महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन ऑगस्टमध्ये होणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे महापालिकेने पाणीकपातीचे नियोजन करताना गंगापूर धरणातील उपलब्ध जलसाठ्यावर ३१ जुलैएेवजी ऑगस्टअखेरपर्यंत नाशिककरांची तहान भागविण्याचे नियोजन केले होते. महापालिकेला गंगापूर, दारणा व मुकणे या तिन्ही धरणांतून वर्षभरासाठी पाच हजार आठशे दलघफू पाणी मंजूर आहे. महापालिका या उपलब्ध जलसाठ्यात ३१ जुलैपर्यंत नाशिककरांची तहान भागवते. पण यंदा ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याचे मोठे आव्हान मनपा प्रशासनासमोर होते. त्यामुळे मागील एप्रिल व मे महिन्यातच शहरात आठवड्यातून एकदा पाणीकपातीचे नियोजन होते. तर चालू जून व येत्या जुलैत आठवड्यात दोनदा पाणीकपातीचा निर्णय घेतला जाणार होता.

या परिस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेने जलसंपदाकडून गंगापूर धरणातून मंजूर आरक्षणाव्यतिरिक्त दोनशे दलघफू व दारणातून शंभर दलघफू पाण्याची मागणी केली. त्यास मंजुरी मिळाल्याने येत्या १५ ऑगस्टपर्यंत नाशिककरांची तहान भागवणे शक्य होणार आहे. तरीही मान्सूनचा लहरीपणा पाहता खरंच पावसाला उशीर झाल्यास अडचणीचे नको म्हणून मनपा जूनपासून पाणीकपातीचा निर्णय घेणार होती. पण मान्सूनने महाराष्ट्राचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या कोकणात जोरदार धडक दिली असून, उर्वरित महाराष्ट्रात लवकर त्याच्या आगमनाची शक्यता आहे.

मान्सून कोकणात दाखल झाल्याने, लवकरच तो महाराष्ट्रभर सक्रिय होण्याची शक्यता आहे. शिवाय मनपाकडे अतिरिक्त तीनशे दलघफू जलसाठा उपलब्ध असल्याने, तूर्तास पाणीकपातीची गरज वाटत नाही.

– उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा, मनपा

हेही वाचा :

The post मान्सूनचे कोकणात आगमन, नाशिककरांवरील पाणीकपात टळणार? appeared first on पुढारी.