मुलगी सतरा वर्षांची! कुणकुण लागताच नाशिक पोलिसांनी रोखला बालविवाह

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा – शासनाच्या वतीने बालविवाह करू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात असतांना नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीतील दत्तनगर कारगिल चौक येथे एका सतरा वर्षीय अल्पवयीन युवतीचा बालविवाह होणार असल्याची माहिती अंबड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे व सहकार्यांना मिळाली आणि बालविवाह रोखण्यासाठी हालचालींना वेग आला.

दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी एका सतरा वर्षीय अल्पवायीन मुलीचा विवाह चाळीसगाव, पोहरे येथील एका मुलासोबत होणार असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली. लग्न घरात खेळीमेळीच्या वातावरणात लग्नाची तयारी सुरु झाली, नातलग जमा झाले, परंतु या लग्नातील वधू अल्पवयीन असल्याने वधू व वरच्या पालकांना तत्काळ पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी पालकांना पोलीस ठाण्यात आल्यानंतर अल्पवयीन मुलीचे लग्न करू शकत नाहीत, तर बालविवाह केल्यानंतर येणाऱ्या समस्त कायदेशीर कार्यवाही बाबतही समजावून सांगण्यात आले. वधू व वरच्या पालकांकडून विवाह करणार नसल्याबाबत लेखी आश्वासन घेण्यात आले. सदर बालविवाह रोखल्यामुळे समस्त अंबड गाववासियांच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.

अल्पवयीन असल्याची केली खात्री 

बालविवाह होणार असलेल्या मुलीचे संपूर्ण कागदपत्र तपासून घेत ती अल्पवयीन असल्याची खात्री करून घेण्यात आली. सदर वधू व वर कुटुंबियांची समजूत काढण्यात पोलीस प्रशासनास यश आल्याने बालविवाह रोखला गेला. अंबड औद्योगिक पोलीस ठाण्याच्या वतीने बालविवाह प्रतिबंध अधिकारी तथा बाल विकास अधिकारी,प्रकल्प नागरी नाशिक शहर यांना देखिल पत्रव्यवहार करीत माहिती देण्यात आलेली आहे.

हेही वाचा :

The post मुलगी सतरा वर्षांची! कुणकुण लागताच नाशिक पोलिसांनी रोखला बालविवाह appeared first on पुढारी.