यांत्रिकी झाडूद्वारे तीन महिन्यांत १६ हजार किमी रस्त्यांची स्वच्छता

यांत्रिकी झाडू,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तब्बल ३३ कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या चार यांत्रिकी झाडूंच्या माध्यमातून जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये शहरातील तब्बल १६ हजार १०५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. एका यंत्राद्वारे दररोज सरासरी ४० किलोमीटर याप्रमाणे चारही यंत्रांद्वारे १६० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची स्वच्छता केली जात असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी दिली आहे.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारकडून प्राप्त अनुदानातून महापालिकेने रस्ते स्वच्छतेसाठी चार यांत्रिकी झाडू खरेदी केले आहेत. डिसेंबर महिन्यात या यांत्रिकी झाडूद्वारे रस्ते स्वच्छतेची चाचपणी केली गेली. त्यानंतर १ जानेवारी २०२४ पासून या यंत्रांद्वारे प्रत्यक्ष रस्ते स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली गेली. या यंत्रांद्वारे जानेवारीत ४६९९ कि.मी., फेब्रुवारीत ६,०७३ कि.मी. तर मार्चमध्ये ५,३३३ कि.मी. अशाप्रकारे तीन महिन्यांत १६,१०५ कि.मी. रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. यंत्राद्वारे एका रस्त्याची स्वच्छता केल्यानंतर पुन्हा तीन ते चार दिवसांनी त्या रस्त्याची यंत्राद्वारे स्वच्छता केली जाते. सुरुवातीला जानेवारी व फेब्रुवारीत रस्त्यावर धुळीचे प्रमाण अधिक असल्याने स्वच्छतेचे प्रमाण धीम्या गतीने सुरू होते. त्यानंतर मात्र वेग वाढत गेला. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत या यंत्रांद्वारे रस्ते स्वच्छता केली जात असल्याने दिवसा वाहतुकीस अडथळा निर्माण होत नाही. या यंत्राद्वारे केल्या जात असलेल्या स्वच्छतेमुळे रस्त्यावरील धुळीचे प्रमाण कमी झाल्याने प्रामुख्याने दुचाकीस्वारांना होणारा धुळीचा त्रास कमी झाल्याचा दावा डॉ. पलोड यांनी केला आहे.

यांत्रिकी झाडूद्वारे या रस्त्यांची स्वच्छता

चार यांत्रिकी झाडूंद्वारे शहरातील त्र्यंबक रोड, गंगापूर रोड, कॉलेज रोड, पेठ रोड, दिंडोरी रोड, शहरातून जाणाऱ्या महामार्गांवरील सर्व्हिस रोड, इंदिरानगर-पाथर्डी रस्ता, हॉटेल गेट वे ते पाथर्डी गाव, द्वारका ते सिन्नरफाटा, देवळाली गाव ते नांदूरनाका, नवीन आडगाव नाका ते नांदूरनाका, निमाणी ते नवीन आडगावनाका, त्र्यंबकनाका सिग्नल ते गडकरी चौक, गडकरी चौक ते तिडके कॉलनी, एबीबी सर्कल ते इंदिरानगर बोगदा आदी रस्त्यांची स्वच्छता केली जात आहे.

ठेकेदाराला ८० हजारांचा दंड

यंत्र पुरवठादार कंपनीलाच पाच वर्षांकरिता यंत्रांचे संचलन व देखभालीचा ठेकाही देण्यात आला आहे. जीपीआरएस यंत्रणेद्वारे या यांत्रिकी झाडूच्या कामकाजावर नियंत्रण ठेवले जात आहे. रस्ते स्वच्छतेच्या निर्धारित उद्दिष्टाच्या ८० टक्क्यांपेक्षा कमी काम झाल्यास ठेकेदाराला देय रकमेवर दहा टक्के दंड आकारला जात आहे. त्याचप्राणे जीपीआरएस यंत्रणा बंद असणे, रस्ते स्वच्छतेवेळी फवारणी बंद असणे, सुरक्षाविषयक नियमांची अंमलबजावणी न होणे, खतप्रकल्पाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी कचरा फेकणे आदी बाबींप्रकरणी दंडात्मक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत ८० हजारांचा दंड करण्यात आला आहे.

हेही वाचा –