युवा महोत्सवातून भाजपची मतपेरणी

मोदींचा नाशिक दौरा,www.pudhari.news

नाशिक : गाैरव जोशी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा सर्वार्थाने वेगळा ठरला. मोदी यांचा रोड-शो, गोदाआरती व काळाराम मंदिरातील पूजनाने नाशिककरांची मने जिंकली. काळाराम मंदिरात स्वच्छतेचा जागर करताना ११ दिवसांच्या अनुष्ठानास शुभारंभ करत नाशिक ते अयोध्या, असा भावनिक सेतू उभारला. युवा महोत्सवातून २०४७ पर्यंत सशक्त व सुदृढ भारताच्या निर्मितीचे आवाहन करताना घराणेशाहीला विरोध करत राजकारणात यावे, असे निमंत्रण देत मोदी यांनी युवकांमध्ये मतपेरणी केली.

एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या तयारीत भाजप आघाडीवर आहे. महाराष्ट्रात महायुतीत म्हणून निवडणुकीला सामाेरे जाताना अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपेयी उत्सुक आहेत. जागा वाटपानंतरच याबाबत स्पष्टता होणार आहे. मात्र, तत्पूर्वी पंतप्रधान मोदींचा नाशिक दाैरा यशस्वी करत भाजपने नाशिक-दिंडोरीसह उत्तर महाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघांवर दावेदारी प्रबळ केली आहे.

युवादिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिकमध्ये २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा उद‌्घाटन सोहळा थाटामाटात पार पडला. या दाैऱ्याचे औचित्य साधत भाजपने नरेंद्र मोदी यांचा राेड शो, काळाराम मंदिरात पूजन व गोदाआरतीचे यशस्वी आयोजन केले. न भुतो, न भविष्यती अशा या आयोजन सोहळ्यामुळे नाशिककर भारावले. याच दौऱ्यात नरेंद्र मोदी यांनी युवा महोत्सवाच्या व्यासपीठावरून केलेले भाषण हे आकर्षणाचा बिंदू ठरले आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात ९ वर्षांत देशाच्या विकासाची घाेडदौड, जनतेसाठी घेतलले निर्णय, युवकांसाठीचे स्टाॅर्टअप, रोजगारनिर्मिती, चांद्रयान मोहीम, आदित्य एल-१ मोहिमेसह विविध योजनांचा लेखाजोखाच देशभरातून आलेल्या युवकांपुढे विशद केला. भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात मोदींनी राजकारणातील घराणेशाहीवर बोट ठेवताना युवकांना चुचकारले.

आगामी लाेकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अचूक टायमिंग साधताना नरेंद्र मोदी यांनी युवावर्गाला मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याचे आवाहन केले. तसेच घराणेशाहीवर आगपाखड करत सध्याचा काळ हा युवकांच्या संक्रमणाचा आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांत नावलाैकिक कमावताना सक्रिय राजकारणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी युवकांना केले. युवावर्गाला राजकारणात संधी डावलणाऱ्या काँग्रेसवर टीकेची झोड उठविताना भाजपत युवा चेहऱ्यांना उज्ज्वल भविष्य असल्याचे संकेत त्यांनी युवकांना दिले. भाजपच्या दृष्टीने मोदींचा नाशिक दौरा यशस्वी ठरला असला तरी पंतप्रधानांच्या आवाहनाला युवावर्ग कसा प्रतिसाद देतो हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

ठाकुरांचा कॉंग्रेसवर निशाणा

युवा महोत्सवात केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनीदेखील विराेधकांचा समाचार घेतला. आपल्या भाषणात टु-जी, कॉमनवेल्थ, कोळसा घोटाळ्याचा उल्लेख करताना कॉंग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामधील ९ वर्षांतील स्टार्टअप इंडिया, रोजगारनिर्मिती, आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आदी मुद्यांना त्यांनी हात घातला. आगामी काळात भारतात आॅलिम्पिक स्पर्धा भरविण्याची घोषणा करत मंत्री ठाकूर यांनी उपस्थित युवकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा :

The post युवा महोत्सवातून भाजपची मतपेरणी appeared first on पुढारी.