रक्तदान दिन विशेष : शिबीरांवरच रक्तसंकलनाची भिस्त

रक्तगट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गरजू रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास ऐनवेळी रक्तदाते उपलब्ध होण्यास अनेक अडचणी येतात. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील मेट्रो रक्तपेढीने जिल्हाभरात शिबीर आयोजीत करून हजारो रक्तपिशव्या संकलित केल्या आहेत. त्यामुळे गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यास मदत मिळाली आहे. जानेवारी २०२२ ते मे २०२३ या कालावधीत सुमारे दहा हजार रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या आहेत.

जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यासह परजिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यात थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. या रुग्णांना नियमीत रक्ताची गरज असल्याने त्यांना रक्तपुरवठा करण्यासाठी रक्तदात्यांची आवश्यकता असते. त्यामुळे रक्तपेढीच्या वतीने जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, कंपन्या, खासगी-शासकीय कार्यालये, पोलिस दल, शिर्डी देवस्थान व इतर ठिकाणी नियमीत रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते. जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या वतीने जिल्ह्यात सुमारे २०० शिबीरे आयोजीत करून १० हजारपर्यंत रक्तपिशव्या संकलित केल्या आहेत. त्यामुळे गरजू रुग्णांची रक्ताची निकड पुरवली जात आहे. जिल्हा रुग्णालयात गरीब, गरजू रुग्ण असल्याने त्यांना रक्तासाठी जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीवर राहावे लागते. त्यामुळे रुग्णालयाच्या वतीनेही जास्तीत जास्त रक्तदाते शोधण्यावर भर असतो.

जिल्हा रुग्णालयासह इतर रुग्णांना दररोज किमान ३५ ते ४० रक्तपिशव्यांची आवश्यकता भासते. त्याचप्रमाणे थॅलेसेमियाग्रस्तांना दररोज ६ ते ८ रक्तपिशव्यांची गरज असते. या रुग्णांना रक्त अत्यावश्यक असून त्यांना नियमीत रक्तपुरवठा करण्यासाठी रक्तदात्यांची गरज आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी जिल्हा रुग्णालयात नियमीत रक्तदान करावे, जेणेकरून रुग्णांचे जीव वाचवण्यास मदत होईल. – डॉ. सतीश शिंपी, मेट्रो रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय.

हेही वाचा:

The post रक्तदान दिन विशेष : शिबीरांवरच रक्तसंकलनाची भिस्त appeared first on पुढारी.