राज्यस्तरीय साहित्य संमेलन : हर घर संविधान संकल्पना राबविणे काळाची गरज – प्रा. डॉ. सतीश मस्के.

pimpalner www.pudhari.news

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

भारतीय संविधानाने येथील प्रत्येक व्यक्तिला संरक्षण बहाल केले आहे. भारतीय संविधानामुळेच स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्य समाजात रुजली गेली. परंतु हल्लीच्या असहिष्णू वातावरणामुळे देशात भयभीत परिस्थिती निर्माण होत आहे. सामान्य माणसांचे जगणे अवघड होत चालले आहे. त्यामुळे प्रत्येकाने संविधानाचा अभ्यास करून देश समृद्ध करण्यासाठी हर घर संविधान संकल्पना राबविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पिंपळनेर, धुळे येथील प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी बुलढाणा येथील राज्यस्तरीय साहित्य संमेलनातील परिसंवादात केले. जयसिंग वाघ हे अध्यक्षस्थानी होते. तसेच पुणे येथील डॉ. शमशुद्दीन तांबोळी, अमरावतीच्या डॉ. सीमा मेश्राम व धुळे-पिंपळनेर येथून डॉ. सतीश मस्के हे सहभागी झाले.

बुलढाणा येथील आंबेडकरी साहित्य अकादमीतर्फे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन गर्दे वाचनालय, बुलढाणा येथील सभागृहात करण्यात आले. यावेळी ‘भारतीय संविधानाला अभिप्रेत भारत’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादात मार्गदर्शन करताना डॉ. मस्के बोलत होते. संविधानाने प्रत्येक माणसाच्या विकासासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हे मूल्ये दिली आहेत. परंतु देशात ही मूल्ये अद्यापही अपेक्षेप्रमाणे रुजलेली दिसत नाहीत. संविधानाने मानवी जीवन, मानवी कल्याण समृद्ध पाहिजे तेवढे दिसून येत नाही. संविधान मूल्ये ही तळागाळापर्यंत रुजली व रुजविली नाहीत. ती रुजविण्यासाठी व आजची जातीय धर्मीय प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने संविधानाचा अभ्यास करून ‘हर घर संविधान’ ही संकल्पना राबविणे काळाची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी ‘हर घर संविधान’ ही संकल्पना सरकारने राबविणे महत्त्वाचे आहे. परिसंवादात डॉ. शमशुद्दीन तांबोळी व डॉ. सीमा मेश्राम यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. अनिल रिंढे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. भगवान शिंदे, डॉ. मंजुराजे जाधव व भारत साळवे यांनी आभार मानले. राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान नागपुरचे साहित्यिक तथा विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी भूषविले. तर पुणे येथील उद्घाटक मुमताज शेख या तर बुलढाणा येथील भीमराव जाधव हे स्वागताध्यक्ष म्हणून होते. संमेलन यशस्वीतेसाठी आंबेडकरी साहित्य अकादमीच्या अध्यक्षा डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे, प्रवक्ते रवी वानखेडे, सुरेश साबळे, विलास सपकाळ, सुदाम खरे आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा:

The post राज्यस्तरीय साहित्य संमेलन : हर घर संविधान संकल्पना राबविणे काळाची गरज - प्रा. डॉ. सतीश मस्के. appeared first on पुढारी.