‘लग्नाचा मांडव सजला रोपांनी, आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याची चर्चा

मांडव मिरवणूकwww.pudhari.news

देवळा (जि. नाशिक) : सावली देणाऱ्या झाडांच्या डहाळ्या तोडून त्यांचा मांडव करण्याऐवजी तशीच नवीन झाडे लावण्यासाठी रोपांची मांडवगाडी सजवून मिरवणूक काढून एक आगळावेगळा मांडव सोहळा देवळा शहरात शुक्रवारी दि. २९ रोजी संपन्न झाला. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन व संदेशफलक लावत फटाके विरहित मिरवणूक काढण्यात आली. या अशा मांडव सोहळ्याचे सगळ्यांनीच कौतूक करत स्वागत केले.

देवळा महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.डी. के.आहेर व प्राथमिक शिक्षिका ज्योती आहेर यांचे सुपुत्र प्रितेश च्या मांडवाच्या कार्यक्रमात हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. सध्या सूर्याचा उष्मा कमालीचा वाढलेला असताना सावली देणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडून त्यांचा मांडव करण्याऐवजी अशीच झाडे पुन्हा बहरावीत यासाठी बैलगाडीत देशी झाडांची रोपे ठेवत त्यांचा मांडव काढण्यात आला. ‘लग्नाचा मांडव सजला रोपांनी – रोपांची आता करू लावणी’ अशी गाणी या मांडवात गुंजली.

फक्त एवढ्यावरच न थांबता पुढील महिन्यांत होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदान करावे यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन मांडवगाडीत लावलेल्या फ्लेक्सद्वारे करण्यात आले. तसेच ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषण होऊ नये म्हणून पूर्ण विवाहसोहळ्यात फटाक्यांची आतषबाजी टाळण्यात आल्याचे यावेळी वरपिता डॉ.आहेर यांनी सांगितले. या अशा पर्यावरणपूरक व लोकशाहीला साथ देणाऱ्या या मांडवसोहळ्यातील उपक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांनीच तसेच ग्रामस्थांनी दाद दिली.

हेही वाचा :

The post 'लग्नाचा मांडव सजला रोपांनी, आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याची चर्चा appeared first on पुढारी.