ललित पळाला की पळवला याचे गुढ कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; ड्रग्ज माफिया ललित पानपाटील-पाटील हा २ ऑक्टोबरला पुणे येथील ससून रुग्णालयातून फरार झाला. पोलिसांच्या हातास झटका देत ललित फरार झाल्याचे सांगण्यात आले. मात्र पोलिस तपासात परिसरातील व रुग्णालयाजवळील एका पंचतारांकित हॉटेलमधील सीसीटीव्हीत ललित पळताना नव्हे तर सामान्य व्यक्तीप्रमाणे शांतपणे पायी चालत जाताना दिसला. त्यामुळे ललित पळाला किंवा त्याला पळवले यावर चर्चा होत आहे. (Lalit Patil Drug Case)

पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर ललित पुणे येथील कारागृहात होता. समोर आलेल्या माहितीनुसार, ललितने कारागृहात अनेकांशी ओळखी केल्या. त्यात कुख्यात गुन्हेगारांसह पोलिस दलातील एका बडतर्फ अधिकाऱ्यासोबतही त्याचे सुत जुळल्याचे बोलले जाते. काही दिवस कारागृहात राहिल्यानंतर ललित आजारपणाच्या बहाण्याने रुग्णालयात दाखल झाला. येथे त्याने पैशांच्या जोरावर उपचार घेण्याऐवजी ऐशोआरामात जगण्यावर भर दिला. जोडिलाच त्याने रुग्णालयात बसूनच एमडी ड्रग्जचे वितरण करीत पैशांचा ओघ कायम ठेवला. ललित याने कोट्यवधी रुपये कमवल्याचे बोलले जात असून लाखो रुपये त्याने त्यास मदत करणाऱ्यांना वाटल्याचे बोलले जाते. ज्या दिवशी ललित रुग्णालयातून पसार झाला त्या दिवसाच्या सीसीटीव्हीत ललित निवांतपणे परिसर न्याहारत पायी जाताना दिसला. त्यामुळे ललितकडे सर्वांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते. तसेच ललित नेहमी याचपद्धतीने रुग्णालयातून जवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये जात असल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे ललितला उपचाराच्या नावाखाली सर्व सुखसोयी मिळत असल्याचे दिसते. त्यास रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दुसऱ्या कैद्याच्या कारचालकाची पळून जाण्यात मदत झाली. त्यामुळे त्याने गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांच्या मदतीने व पैसे देत हवे ते मिळवले व रुग्णालयातून पसारही झाल्याचे समोर आले.

देश -विदेशात जाळे

ललित याने ड्रग्जच्या व्यवहारात देश विदेशात जाळे पसरवले. तेदेखील रुग्णालयात बसून! तसेच त्याने पैशांच्या जोरावर व गुन्हेगारी क्षेत्रासह शासकीय यंत्रणांना हाताशी धरून व्यवहार सुरळीत ठेवले. त्यानंतरही पोलिसांची कारवाई होण्याची दाट शक्यता दिसल्याने त्याने याच यंत्रणांना हाताशी धरून पळ काढल्याचे समोर आले आहे. जोपर्यंत त्यास अटक होत नाही तोपर्यंत त्याच्या व्यवहारांचे व त्यास मदत करणाऱ्यांचे धागेदोरे समोर येणार नाही. त्यामुळे त्यास पळवणाऱ्यांकडून तो पकडला जाऊ नये यासाठीच जास्त प्रयत्न असल्याचे दिसते.

हेही वाचा :

The post ललित पळाला की पळवला याचे गुढ कायम appeared first on पुढारी.