लाल वादळ : गावित यांचा सरकारला तीन दिवसांचा ‘अल्टिमेटम’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दोन दिवसांपासून शहरात ठाण मांडून असलेल्या लाल वादळातील आंदोलकांच्या मागण्यांबाबत निर्णय झाला नाही, तर मुंबईला लाँग मार्च काढण्याचा इशारा माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जे. पी. गावित यांनी दिला आहे. वनजमिनींसह अन्य १६ मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. गावित यांनी प्रशासनाला तीन दिवसांचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. त्यामुळे आता लाल वादळाचा मुक्काम शहरात वाढला आहे.

शेतकरी व कष्टकरी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ‘माकप’ व किसान सभेने सोमवारपासून (दि. २६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे. याविषयी तोडगा काढण्यासाठी मुंबईत वनहक्क अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांची बैठक झाली. शिष्टमंडळात माजी आमदार जे. पी. गावित, डॉ. डी. एल. कराड व त्यांचे सहकारी हजर होते. पण, मंत्र्यांनी फक्त आश्वासनेच दिली. प्रत्यक्ष कृती दिसून न आल्यामुळे आंदोलकांनी येथून माघार घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामुक्काम आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

जे. पी. गावित यांनी बुधवारी (दि. २८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाण्याच्या टँकरवर चढून संवाद साधला. आपण सरकारला तीन दिवसांचा वेळ देत आहोत. या काळात त्यांनी आपल्या मागण्यांबाबत शासन निर्णय पारित करण्याचे आवाहन केले. अन्यथा, त्या पुढील काळात शासनाशी चर्चा बंद करून थेट मुंबईला जाण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. त्यासाठी तालुकानिहाय नियुक्त सचिवांवर जबाबदारी निश्चित केली आहे.

आंदोलकांचे पर्याय
– शनिवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
– त्यानंतर जेलभरो आंदोलन, बेमुदत उपोषणाची घोषणा
– अंतिम पर्याय म्हणून मुंबईत लाँग मार्च काढणार

तुमची तयारी आहे ना…
शनिवारपर्यंत सरकारने निर्णय घेतला नाही, तर आपण त्यापुढे बेमुदत उपोषण सुरू करू, जेलभरो आंदोलन करू किंवा मुंबईचा मार्ग धरू. पण त्यासाठी सर्वांची तयारी असायला हवी. तुमची तयारी आहे ना, असा प्रश्न आंदोलकांसमोर उपस्थित केला. यावर आंदोलकांनी हात उंचावून त्यांना होकार दर्शवला.

शिस्तीचे पालन करा
गावावरून आपण मागण्या मान्य करण्यासाठी इथपर्यंत आलो आहोत. नाशिक दर्शन किंवा फिरायला आलो नाही. याचे भान ठेवून प्रत्येक आंदोलकाने शिस्तीचे पालन केले पाहिजे. कुणीही मद्यप्राशन करून आंदोलनात सहभागी होणार नाही, याची काळजी प्रत्येक तालुक्याने घ्यावी, अशा कडक शब्दांत सूचना माजी आमदार गावित यांनी दिल्या.

The post लाल वादळ : गावित यांचा सरकारला तीन दिवसांचा 'अल्टिमेटम' appeared first on पुढारी.