वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्राला अवकाळी पाऊस

weather update pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्राला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने (Hailstorm) झोडपून काढले आहे. हवामानातील बदलाचा परिणाम अद्यापही कामय असल्याने पुढील दोन दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरींसोबत गारपिटीचा (Hailstorm) इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त उष्ण वारे यांच्या संयोगामुळे नाशिकसह राज्यामध्ये येत्या ४८ तासांत काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस व गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मागील चार दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले आहे. नाशिक जिल्ह्यालाही या पावसाने तडाखा दिला आहे. त्यामुळे शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

नाशिक शहर व परिसरामध्ये गुरुवारी (दि. २९) ढगाळ हवामान कायम होते. त्यामुळे हवेतील उष्म्यात काही प्रमाणात वाढ झाली, तर ग्रामीण भागातही वातावरणातील बदलाचा परिणाम दिसून येत आहे. पुढील दोन दिवस अवकाळी तसेच गारपिटीचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमालाची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

…म्हणून पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर भारतात पश्चिमी विक्षोप (उत्तरेकडून येणारा थंड हवेचा झंझावात) सक्रिय आहे. एक द्रोणिका रेषा दक्षिण कर्नाटकपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत आहे. प्रति चक्रवाताच्या स्थितीमुळे बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त उष्ण वारे राज्यात येत आहेत. या थंड वाऱ्याचा आणि बाष्पयुक्त उष्ण वाऱ्याचा उत्तर महाराष्ट्रात संयोग होऊन तुरळक ठिकाणी गारपीट (Hailstorm) आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्राला अवकाळी पाऊस appeared first on पुढारी.