शांतीगिरी महाराजांकडे ३८ कोटींची मालमत्ता, ७५ हजारांचे कर्ज

शांतिगिरी महाराज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक घातून नामनिर्देशनपत्र दाखल केलेले अपक्ष ऊमेदवार शांतीगिरी महाराज यांनी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात मालमत्तेचा तपशील सादर केला आहे. त्यांच्याकडे एकुण ३८ कोटी ८१ लाख ५३ हजार ५३३ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. शांतीगिरी महाराज यांच्याकडे ९ वाहने असून त्यांच्यावर ७५ हजारांचे कर्ज आहे. विविध ठिकाणी मठ, गुरूकुल, शेती व निवासी मालमत्तांचे ते धनी आहेत.

वेरुळ मठाचे मठाधिपती असलेले शांतीगिरी महाराज हे मुळचे नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव येथील आहे. १९८९ साली जनार्धन स्वामी यांचे निर्वाण झाले. त्यानंतर 25 डिसेंबर 1989 साली शांतीगिरी महाराजांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. शांतीगिरी महाराज हे संन्यस्त स्वीकारलेले योगी आहेत. आजन्म ब्राह्मचारी राहण्याचं त्यांनी व्रत घेतलं आहे. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानूसार लाखलगाव येथील शाळेतून १९७६ साली एसएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

शांतीगिरी महाराज यांनी प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या माहितीनूसार त्यांच्याजवळ ७१ लाख ६८ हजार ६६४ रूपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यामध्ये ६७ लाख ९१ हजार ४८६ रुपये मुल्याच्या ९ वाहनांचा समावेश आहे. सफारी, टेम्पो, पिकअप, दोन स्कुलबस, टाटा ४०७, हायवा, एमयुव्ही, टीयुव्ही अशी विविध वाहने त्यांच्या ताफ्यात आहे. तसेच १२ बँक खात्यात ७० हजार ४५८ रूपयांची रक्कम असून हाती ५० हजार रुपये कॅश स्वरूपात आहे. एफडी व विमा पॉलिसीचे मुल्य २ लाख ५६ हजार ७२० रुपये आहे. दरम्यान, स्थावर मालमत्तेत ५३ ठिकाणी वारसा हक्क व स्वमालकीची शेतजमीन असून निवासी संकुलाचाही समावेश आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ, कन्नड, खुलताबाद, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नगर जिल्हातील कोपरगाव आदी ठिकाणी या मिळकती आहे. शेकडो एकर क्षेत्राचा यात समावेश आहे. त्यांच्या नावावर एकही पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल नाही.