सशस्त्र दरोडा टाकून अपहरण केलेल्या तरुणीचा 12 तासांत छडा 

अपहरण,www.pudhari.news

पिंपळनेर:(ता.साक्री)पुढारी वृत्तसेवा; दहिवेल रस्त्यालगत असलेल्या सरस्वती नगरात दरोडेखोरांनी जबरी चोरी करतानाच घरातील 23 वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. या घटनेने साक्रीसह संपुर्ण धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या तरुणीचे फोटो काल दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अखेर या तरुणीचा अवघ्या 12 तासांत छडा लावण्यात साक्री पोलिसांना यश आले आहे. तिला सांगवी पोलिसांच्या मदतीने सेंधव्याहुन ताब्यात घेण्यात आले. सदर तरुणी सुखरुप असून ती भेदरलेल्या अवस्थेत होती.

शहरातील सरस्वती नगरात रात्री 10.30 वाजता बंद घराचा दरवाजा ठोठावून अज्ञात दरोडेखोरांनी जबरी चोरी केल्याची घटना घडली होती. यावेळी घरात ज्योत्स्ना निलेश पाटील व त्यांची 23 वर्षीय भाची या दोघीच घरात होत्या. तर ज्योत्स्ना पाटील यांचे पती निलेश पाटील हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. ते बाहेरगावाहून आले असतील, असे वाटल्याने त्यांनी घराचा दरवाजा उघडला. मात्र,ही संधी साधून दरोडेखोरांनी चाकु व बंदुकीचा धाक दाखवत 88 हजार 500 रुपये किमतीचे दागिने जबरीने चोरुन नेले. तसेच 23 वर्षीय भाचीला देखील सोबत पळवून नेले. याबाबत ज्योत्स्ना पाटील यांनी साक्री पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला. शिवाय सोशल मीडियातूनही सदर तरुणीचे फोटो व ती सापडल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले जात होते.

सेंधव्यातून घेतले ताब्यात

साक्री पोलिसांत या गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी काल दिवसभर चारही दिशांना शोध सुरु ठेवला होता. तपास सुरु असतानाच अपहृत तरुणीने काल रात्री 10 वाजेच्या सुमारास तिचे वडील मोठाभाऊ शेवाळे यांना फोन केला व मी सेंधवा (मध्यप्रदेश) येथे असल्याचे कळविले. त्यानुसार तिच्या वडीलांनी साक्री पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लागलीच खात्री करुन सेंधवा पोलिसांशी संपर्क साधला. तसेच मध्यप्रदेश हद्दीवरील सांगवी पोलिसांनाही माहिती देण्यात आली. त्यानुसार सांगवी पोलिस ठाण्याचे पीएसआय संदीप पाटील, एपीआय जयेश खलाणे,पोकॉ पुरोहित,सुनिता पवार,पोहवा केदार बागुल,चालक मिर्झा यांचे पथक सेंधव्याला रवाना झाले. त्यांनी तरुणीला आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर आज मध्यरात्री साक्री पोलिसांनी सांगवी पोलिसांकडून तरुणीला ताब्यात घेतले. यावेळी तरुणीचे वडीलही सोबत होते. दरम्यान, सदर तरुणी सुखरुप असून पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध जारी असल्याची माहिती डीवायएसपी साजन सोनवणे यांनी आज पत्रपरिषदेत दिली.

यांनी केली कामगिरी

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण पारधी यांनी व त्यांचे सहकारी पोसई रोशन निकम, प्रसाद रौंदळ, पोहेकॉ संजय शिरसाठ, रामलाल अहिरे, बापू रायते, उमेश चव्हाण, विक्रांत देसले, मसाई आशा चव्हाण, मपोना इला गावित, शांतीलाल पाटील, पोना संदीप सावळे, पोकों तुषार जाधव, चेतन गोसावी, हेमंत सोनवणे, गुलाब शिंपी व स्टाफ यांनी केली.

The post सशस्त्र दरोडा टाकून अपहरण केलेल्या तरुणीचा 12 तासांत छडा  appeared first on पुढारी.