सान्वी अंगणात खेळत होती, तोंड बांधलेले दोघे दुचाकीवरुन आले अन्

सिन्नर अपहरण,www.pudhari.news

सिन्नर(जि. नाशिक): तालुक्यातील देवपूर येथील तीनवर्षीय बालिका घराच्या अंगणात खेळत असताना दोघांनी तिचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. १९) दुपारी १२ च्या सुमारास घडली. सगळ्या तालुक्यात खळबळ उडाली. शोधा-शोध सुरु झाली. तथापि, दीड तासांनी घरापासून तब्बल तीन किलोमीटर लांब असलेल्या मक्याच्या शेताजवळ धाय मोकलून रडताना अपह्रत बालिका आढळून आली.  (Nashik Girl Kidnapping)

सान्वी अविनाश वाणी (३) ही बालिका देवपूर येथील राहत्या घरासमोर खेळत होती. घराजवळ आजी-आजोबा व चुलती होती. मात्र सान्वी दिसत नसल्याने आजोबांसह कुटुंबीयांनी चौकशी सुरू केली. तेवढ्यात सुनील वाणी तेथे आले. दुपारी १२ च्या सुमारास त्यांना दुचाकीवरून तोंडाला कपडा बांधून दोन व्यक्ती घराजवळ येताना दिसल्या होत्या.

त्यामुळे ‘त्या दोघांनीच बालिकेचे अपहरण केल्याचा संशय बळावला. कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला. पोलिस यंत्रणेसह परिसरातील मित्र, परिवार, नातेवाइकांना मोबाइलवरून माहिती आणि मेसेज पाठविण्यात आले. देवपूरकडून वेगवेगळ्या रस्त्यांवर नातेवाईक, मित्र परिवाराने शोध सुरू केला. वावीसह एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासचक्रे गतिमान केली.

सुमारे दीड तासाने बालिका अपहरण प्रकरणावर पडदा पडला. अपहरणकत्यांनी बालिकेला निर्जनस्थळी सोडून पोबारा केला होता.  अपहृत बालिका दीड तासाने घरापासून तीन किमी अंतरावर मकाच्या शेताजवळ धाय मोकलून रडताना आढळली. त्यामुळे कुटुंबीयांसह सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. तथापि, अविनाश वाणी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात अपहरणकत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक रमेश पाटील पुढील तपास करीत आहे.

‘ती’ गवतात धाय मोकलून रडत होती (Nashik Girl Kidnapping)

अवघ्या तीन वर्षांच्या बालिकेचे अपहरण झाल्याची बातमी एरवी सोशल मीडियाच्या माध्यमाने जिल्हाभर पसरली. फोनाफोनी आणि चौकशी सुरू झाली. वाणी कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला होता. काही विपरित घडू नये, अशीच प्रार्थना सगळे करत होते. शोधाशोध सुरू असतानाच डॉ. सागर वाणी यांना देवपूरहून मिठसागरेकडे जाणाऱ्या मधल्या रस्त्यालगत मकाच्या शेताजवळ गवतात मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी धाव घेतली. तीन वर्षांची बिचारी सान्वी धाय मोकलून रडत होती. सागर यांनी तिला कुशीत घेतले आणि घराकडे आणले. तिला पाहून वाणी कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.

हेही वाचा :

The post सान्वी अंगणात खेळत होती, तोंड बांधलेले दोघे दुचाकीवरुन आले अन् appeared first on पुढारी.