सुरगाणा तालुक्याने घेतला कुपोषणमुक्तीचा संकल्प

सुरगाणा,www.pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा; सुरगाणा तालुक्यातील सुरगाणा व बाऱ्हे प्रकल्पातील १९५ सॅम व मॅम बालक पालक यांचा किलबिल मेळावा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत पार पडला.

नूतन महाविद्यालयात तालुका कार्यक्रम महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रथिनयुक्त आहार, स्थलांतर टाळण्यासाठी मनरेगा अंतर्गत स्थानिक रोजगार उपलब्ध करणे, कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी सॅम बालकांची काळजी घेणे, विविध शासकीय योजनेचा लाभ घेणे व सुरगाणा तालुका हा कुपोषण मुक्त कसा होईल, यादृष्टीने सर्व जिल्हा परिषद अंतर्गत विभागांनी समन्वय साधून सहकार्याने प्रयत्न करणे याबाबत यावेळी मित्तल यांनी मार्गदर्शन केले.

दरम्यान, पोषण दिंडी, कडधान्य, तृणधान्य, पालेभाज्या, फळभाज्या, पाककला कृती प्रदर्शन, बाळ कोपरा, स्तनपान प्रशिक्षण, आहार, आरोग्य व पोषण समुपदेशन करण्यात आले होते. आरोग्य विभागामार्फत आरोग्य मेळाव्यामध्ये सहभागी सर्व बालके, स्तनदा माता व पालक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध योजनांचे स्टॉल व प्रशिक्षण तसेच विशेषतः कुपोषित बालकांच्या पालकांसाठी जिल्हा परिषदने राबवलेल्या विशेष कुक्कुटपालन योजनेची माहिती देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले होते. सर्व लाभार्थ्यांना सकस आहार किटचे वाटप करण्यात आले. कीटमध्ये शेंगदाणे, सुके खोबरे, भाजलेले चणे, गावरान तूप व गूळ असा प्रथिनयुक्त आहार आहे. तसेच लाभार्थ्यांना उकडलेल्या अंड्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र बागुल, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिंदे, गटविकास अधिकारी महेश पोतदार, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला बालविकास अधिकारी प्रताप पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, पशुसंवर्धन विभाग, ग्रामपंचायत विभाग, उमेद, आरोग्य विभाग अशा सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

हेही वाचा :

The post सुरगाणा तालुक्याने घेतला कुपोषणमुक्तीचा संकल्प appeared first on पुढारी.