सोशल मीडियावर गुन्हेगारांची ‘वाहवा’ करणाऱ्यांविरोधात कारवाई

crime News

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- खुनाच्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात असलेल्या गुन्हेगारांच्या नावे सोशल मीडियावर खाते तयार करून त्यांची वाहवा करणाऱ्यांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खाते तयार करणाऱ्यासोबत तेथील व्हिडिओवर लाइक, कमेंट करणाऱ्या एकूण १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश गिते, राहुल प्रकाश डोंब, गौरव जाधव, केशव दिघे, साई चव्हाण, आर्यन नवले, चेतन दिनकर पाटील, चेतन बहिरम यांच्यासह इतर तीन इन्स्टाग्राम खातेधरकांविरोधात फौजदारी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात ओम पवार ऊर्फ ओम्या खटकी व इतर संशयितांनी संगनमत करून संदीप आठवले या तरुणाचा खून केला होता. खून केल्यानंतर ओम्या खटकी याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करून संदीपचा खून केल्याची कबुली दिली. संदीपने ओम्या खटकी व इतरांना मारहाण केल्याचा व्हिडिओ अपलोड केल्याच्या रागातून टोळीने संदीपचा खून केल्याचे उघड झाले. त्यामुळे सोशल मीडियावरील बदनामी व वर्चस्ववादातून खून झाल्याचे समोर आले. त्यानंतर खून प्रकरणी पोलिसांनी संशयितांची धरपकड करून कारागृहात रवानगी केली.

दरम्यान, या घटनेनंतर गुन्हेगारांच्या समर्थकांनी ओम्या खटकीच्या नावाने इन्स्टाग्रामवर खाते उघडून त्याच्या नावाची दहशत करण्याचा प्रयत्न केला. ओम्या खटकीसह इतर गुन्हेगारांचे व्हिडिओ, छायाचित्र अपलोड करून ‘नाशिकचा किंग’, ‘भाईजी’ अशा नावाने त्यांची हवा करण्याचा प्रयत्न खातेधारकाने केला. तर इतर जणांनी त्या खात्यावरील पोस्टला लाइक व कमेंट केल्या. ही बाब उघडकीस आल्यानंतर अंबड पोलिसांनी १२ जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

दहशत दाखवण्याचा प्रयत्न

सोशल मीडियावर अनेक गुन्हेगारांचे खाते असून, त्यावर ते त्यांची दहशत दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यात काही समर्थकांकडून वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्या, ऑडिओ क्लिप, व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज अपलोड करून गुन्हेगारांची हवा करण्याचा प्रयत्न करतात. तर काही वेळा गुन्हेगार सोशल मीडियावर रिल तयार करीत उघड उघड जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे प्रकार घडले आहेत.

हेही वाचा :

The post सोशल मीडियावर गुन्हेगारांची 'वाहवा' करणाऱ्यांविरोधात कारवाई appeared first on पुढारी.