रामलल्लासाठी येवल्याच्या पैठणीचे पितांबर व शेला

येवला,www.pudhari.news

येवला : पुढारी वृत्तसेवा; येत्या 22 जानेवारी रोजी अयोद्धेत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून सोहळा भव्य स्वरुपात होणार आहे. न भूतो न भविष्यती होणाऱ्या या सोहळ्यात आपलाही सहभाग असावा असे प्रत्येक रामभक्ताला वाटते आहे. या नियोजनात सहभागी होण्याचा मान येवल्याच्या महावस्त्राच्या माध्यमातून येथील कापसे पैठणी व कापसे फाउंडेशनलाही मिळाला आहे. (Ram Mandir Inauguration)

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातून विविध मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील 359 जणांपैकी नाशिक जिल्ह्यातील येवला येथील कापसे फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब कापसे यांना देखील हे निमंत्रण प्राप्त झाले आहे.

कापसे फाउंडेशनच्या वडगाव येथील दिव्यांग आणि अनाथ कारागिरांकडून हाताने हॅण्डलूमवर प्रभू श्रीराम यांच्यासाठी शेला आणि पितांबर बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पितांबर व शेलासाठी लागणारा धागा फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करून तयार करण्यात आला आहे. तब्बल सहा महिन्यांपासून हे वस्त्र तयार करण्याची तयारी सुरु आहे. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला पैठणीपासून बनविलेले ११ मीटरचे वस्त्र परिधान केले जाणार आहे. (Ram Mandir Inauguration)

251 किलो तूप होमहवनसाठी…

यासह कापसे फाउंडेशन येथे सुमारे 400 गीर गायींचा प्रकल्प असून या शुद्ध देसी गिर गाईंच्या दुधापासून 251 किलो तूप हे देखील आयोध्येत होणाऱ्या होम हवन साठी पाठवले जाणार आहे. यासह गीर गायींच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या गोऱ्या, पणत्या, आणि होम तयार करण्यासाठी लागणारी शेणाची वीट आणि इतर साहित्य देखील कापसे फाउंडेशन वडगाव तालुका येवला येथून आयोध्या येथे पाठवले जाणार आहे. अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब कापसे यांनी दिली आहे. वडगाव येथे नाशिकसह, अहमदनगर, छत्रपतीसंभाजी नगर येथून नागरिक हा शेला व वस्त्र पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत. (Ram Mandir Inauguration)

साहित्याची मिरवणूक

येवला आणि वडगाव येथे शेणापासून तयार करण्यात आलेले दिवे, विटा आणि २५१ किलो शुद्ध तूप आदींची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर हे साहित्य अयोध्येकडे वाहनाने रवाना होणार असल्याची माहिती कापसे फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब कापसे यांनी दिली आहे.

पैठणी म्हटलं की येवला….

पैठणी महाराष्ट्राचे राजवस्त्र आहे. पैठणी म्हटलं की येवला आणि येवला म्हटलं की पैठणी असे समीकरण आहे. देशासह थेट परदेशातही येथील पैठणी महिलांच्या मनावर राज्य करते. एकूण पैठणी उत्पादनात येवल्याचा सुमारे ८० टक्के वाटा आहे. त्यामुळे खरी पैठणी येवल्याचीच असे समजले जाते. येवला शहरात आल्यानंतर अनेक प्रकारच्या नवनव्या पैठणीचे प्रकार पाहायला मिळतात. आता येवल्याची पैठणी रामलल्लाच्या सेवेत जाणार असल्याने तीचे महत्व अधिकच वाढणार आहे.

हेही वाचा :

The post रामलल्लासाठी येवल्याच्या पैठणीचे पितांबर व शेला appeared first on पुढारी.