३१ डिसेंबरपूर्वी ३० आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्याचा अल्टिमेटम

डॉ. भारती पवार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- १०६ आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या उभारणीसाठी केंद्र शासनाकडून महत्प्रयासाने मिळवलेल्या ६५ कोटींचा निधी महापालिकेच्या बांधकाम व वैद्यकीय विभागाच्या नाकर्तेपणामुळे परत जाण्याची चिन्हे दिसू लागल्यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महापालिका प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली. ३१ डिसेंबरपूर्वी शहरात किमान ३० आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्याचा अल्टिमेटम डॉ. पवार यांनी दिला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी तातडीची बैठक बोलवत मुदतीत काम पूर्ण करण्याची तंबी अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराला दिली आहे.

कोरोनामुळे आरोग्य केंद्रांचे महत्त्व सर्वांनाच कळाले. गोरगरीब नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका क्षेत्रात १०६ आरोग्यवर्धिनी केंद्रांची उभारणी करण्यासाठी राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या प्रयत्नांतून महापालिकेला तब्बल ६५ कोटींचा निधी उपलब्ध झाला. महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर चुंचाळे शिवारात आरोग्यवर्धिनी केंद्राची उभारणी करत उर्वरित १०५ केंद्र उभारणीची प्रक्रिया सुरू केली. ९२ जागा निश्चित झाल्यानंतर त्यासाठीचे प्राकलन तयार करण्यात आले. पैकी ३९ उपकेंद्रांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. २७ एमबीबीएस डॉक्टरांची निवड झाली आहे. दरम्यान, पुढील प्रक्रिया पुढे सरकत नसल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत आरोग्यवर्धिनी केंद्रांचे उद‌्घाटन अडकण्याची शक्यता आहे. या केंद्रांची उभारणी निर्धारित मुदतीत पूर्ण न झाल्यास ६५ कोटींचा निधी शासनाकडे परत जाण्याचा धोकाही आहे. यासंदर्भात टीका झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी महापालिका प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली. डिसेंबरअखेर किमान ३० आरोग्य केंद्रे सुरू करण्याचा अल्टिमेटमही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आयुक्त तथा प्रशासक डॉ. करंजकर यांनी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण व अन्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक गुरुवारी (दि. २१) घेतली. आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांनाही या बैठकीस बोलावण्यात आले होते. या बैठकीत आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ३० आरोग्यवर्धिनी केंद्रांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले.

१५ जानेवारीला उद‌्घाटन

महापालिकेच्या सहा विभागांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्यवर्धिनी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. सिडको विभागात २२, पंचवटी विभागात २०, नाशिकरोड विभागात १८, सातपूर विभागात १६, पश्चिम विभागात १४, पूर्व विभागात १६ आरोग्यवर्धिनी केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. ३१ डिसेबरपर्यंत ३० केंद्रे सज्ज केली जाणार असून, त्यानंतर ट्रायल रन घेऊन १५ जानेवारीला डॉ. पवार यांच्या उपस्थितीत उद‌्घाटन सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

असे असेल आरोग्यवर्धिनी केंद्र

आरोग्यवर्धिनी केंद्रांसाठी महापालिका इमारत व पायाभूत सुविधा पुरविणार आहे. इमारतींच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च महापालिका स्वनिधीतून करेल. एका केंद्रात एक एमबीबीएस डॉक्टर, एक स्टाफ नर्स, एक बहुउद्देशीय सेवक व एक सहायक अशी नियुक्ती केली जाईल. या केंद्राच्या माध्यमातून हायपर टेन्शन, रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा व गर्भाशय कर्करोग या आजारांवर उपचार केले जाणार आहे. त्याचबरोबर सर्वेक्षण व उपचार हादेखील महत्त्वाचा भाग असेल.

हेही वाचा :

The post ३१ डिसेंबरपूर्वी ३० आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्याचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.