नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उमेदवारी घोषणेला झालेला विलंब आणि बंडखोर-अपक्षांमुळे निर्माण झालेला मतविभागणीचा धोका विजयाचा मार्ग खडतर बनविणारा ठरू नये यासाठी महायुतीने उमेदवाराच्या प्रचाराची भक्कम तटबंदी उभारताना घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना दिलेले मतांचे टार्गेटही आता चर्चेत आले आहे. विशेषत: नाशिक लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या तीन व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन्ही आमदारांच्या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला किती मताधिक्य मिळते याकडे नेत्यांचे लक्ष राहणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी वाटपाच्या वेळी पात्रतेबाबतच्या अनेक निकषांपैकी लोकसभा निवडणुकीत किती मताधिक्य मिळवून दिले हाही एक निकष तपासला जाण्याची शक्यता असल्याने आमदारांना धडकी भरली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ‘अब की बार ४०० पार’चा नारा दिला आहे. नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर बसविण्याचा चंग भाजपने बांधला आहे. त्यादृष्टीन निवडणुकीची व्यूहरचना आखण्यात आली असून, बड्या नेत्यांच्या प्रचारसभा, रॅलींचे नियोजन केले जात आहे. निवडणूक रणात जास्तीत जास्त जागा मिळवून मोदींना पंतप्रधानपदाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी भाजपने तयारी केली आहे. त्याचाच भाग म्हणून बड्या नेत्यांच्या जाहीर सभांपासून ते बूथलेव्हलच्या कार्यकर्त्यांपर्यंत जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नर, इगतपुरी-त्र्यंबक, देवळाली, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम व नाशिक मध्य हे सहा मतदारसंघ आहेत. शहरी भागातील नाशिक मध्य, नाशिक पश्चिम व नाशिक पूर्व हे तीनही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. या मतदारसंघांमध्ये अनुक्रमे भाजपच्या प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे व ॲड. राहुल ढिकले हे आमदार आहेत. तर, ग्रामीण भागातील सिन्नर तसेच शहरी व देवळाली कॅन्टोन्मेंट, भगूर नगरपालिकेच्या परिसराचा समावेश असलेला देवळाली मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या ताब्यात आहे. या दोन्ही मतदारसंघांत अनुक्रमे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ॲड. माणिकराव कोकाटे व सरोज अहिरे या आमदार आहेत.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार शिवसेनेचे हेमंत गोडसे दोन लाख ९२ हजार २०४ मतांच्या फरकाने राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत लोकसभा मतदारसंघातील सिन्नरचा अपवाद वगळता उर्वरित पाचही विधानसभा मतदारसंघांतून गोडसे यांना बहुमत मिळविण्यात यश आले होते. त्यामुळे आता तिसऱ्यांदा गोडसे निवडणूक रिंगणात असताना महायुतीच्या आमदारांसाठी लोकसभा निवडणूक जणू लिटमस टेस्टच असणार आहे. कोणत्या मतदारसंघातून गोडसे यांना किती मताधिक्य मिळते याकडे महायुतीच्या नेत्यांचे लक्ष राहणार असून, त्यावरच आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचे गणित अवलंबून राहणार असल्याचे सांगण्यात येते.
गत निवडणुकीतील असे मिळाले मताधिक्य!
गत लोकसभा निवडणुकीत आमदार ॲड. कोकाटे स्वत: निवडणूक रिंगणात होते. त्यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक ९१,११४ मते मिळाली होती. गोडसे यांच्या पदरात ५६,७७६ मते पडली होती, तर समीर भुजबळ यांना जेमतेम ३०,९४२ मते मिळविता आली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विरोधी उमेदवार असलेल्या राजाभाऊ वाजे यांनी त्यावेळी गोडसे यांच्यासाठी काम केले होते. देवळाली मतदारसंघात सर्वाधिक ८०,६८८ मतं मिळवत गोडसे प्रथम क्रमांकावर राहिले. भुजबळांना ३८,७५५ मतं मिळाली, तर कोकाटे यांच्या पदरात जेमतेम १०,०९६ मतं पडू शकली. इगतपुरी मतदारसंघातूनही गोडसे यांनी आघाडी घेतली होती. त्यांना या मतदारसंघातून ६८,९७०, भुजबळांना ६३,५१८, तर कोकाटे यांना १३,६७० मतं मिळाली होती. नाशिक पूर्वमध्ये गोडसे यांना १ लाख १७ हजार १२७, भुजबळांना ४०,८५९ तर कोकाटे यांना ६,६६६ मतं मिळू शकली होती. मध्य आणि पश्चिम मतदारसंघातही स्पष्टपणे मोदी लाटेचा परिणाम दिसून आला होता. मध्य मतदारसंघात गोडसेंना ९४,४२९, भुजबळांना ५६,४५९ मतं मिळाली होती. नाशिक पश्चिम मतदारसंघ गोडसेंना सर्वाधिक मताधिक्य देणारा ठरला होता. या मतदारसंघातून गोडसेंना सर्वाधिक एक लाख ४४ हजार १४४ मतं मिळाली होती. समीर भुजबळ यांना अवघी ४०,३२१ मतं मिळाली होती. गत निवडणुकीपेक्षा यंदा राजकीय परिस्थिती भिन्न असली तरी आमदारांना मताधिक्य मिळवून देण्याचे आव्हान कायम असणार आहे.