Nashik : विवाहितेच्या मारेकऱ्यांच्या अटकेसाठी घोटीत मोर्चा

घोटी मोर्चा,www.pudhari.news

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेच्या खून प्रकरणी गावातील महिलांनी घोटीतील जैन मंदिरापासून बाजारपेठमधून घोटी पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चा काढत मारेकऱ्यांच्या अटकेची मागणी केली.

इगतपुरी तालुक्यातील खंबाळे शिवारातील शासकीय विश्रामगृहाजवळील खदाणीजवळ रविवारी (दि. २१) सकाळी दहाच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेचा खून करण्यात आला होता. या घटनेनंतर खंबाळे परिसर तसेच घोटी शहरात संतप्त वातावरण आहे. मंगळवारी सायंकाळी स्वराज्य संघटनेचे संपर्कप्रमुख करण गायकर, रूपेश नाठे, खंबाळेच्या सरपंच द्वारकाबाई शिंदे, उपसरपंच दिलीप चौधरी, गौतम भोसले, रिपाइंचे मंगेश रोकडे, महिला आघाडीच्या अनिता घारे, घोटी ग्रामपालिकेच्या सदस्या वैशाली गोसावी, डॉ. दत्ता सदगीर, डॉ. महेंद्र शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली घोटीतील जैन मंदिरापासून बाजारपेठेतून घोटी पोलिस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो नागरिक व महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चा पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिस ठाण्यातील आवारात शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मेणबत्त्या पेटवून पीडित महिलेला श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी या घटनेतील मारेकऱ्यांना तत्काळ दोन दिवसांत शोधून कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा दोन दिवसांनी मंत्रालयावर मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

यावेळी खंबाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी सांगितले की, या परिसरात गावठी दारूचे अवैध धंदे सुरू असून, याबाबत ग्रामपंचायतीने अनेक वेळा घोटी पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले होते. मात्र, तरीही हे अवैध गावठी दारूचे धंदे सुरू असल्यानेच ही भयंकर घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर घोटी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक खेडकर यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी उपसरपंच दिलीप चौधरी यांच्याकडून करण्यात आली.

हेही वाचा :

The post Nashik : विवाहितेच्या मारेकऱ्यांच्या अटकेसाठी घोटीत मोर्चा appeared first on पुढारी.