Nashik : अपघातामुळे वाचले गायींचे प्राण ; बेशुद्धीच्या औषधांसह कार पोलिसांकडून जप्त

नाशिक,www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

शहरातून बुधवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास इनोव्हा कारमधून दोन गायी चोरून नेताना अपघात झाल्याने गोवंश तस्कर वाहन सोडून पळाले. यामुळे गायींचे प्राण वाचले आहेत. एमएच 06, एएफ 5450 या इनोव्हा वाहनात बेशुद्ध दोन गायी घेऊन तस्कर जव्हार रस्त्याने गणपतबारी येथे आले. त्र्यंबकेश्वर शहरापासून दोन किमी अंतरावरील पिंपळदमार्गे जाताना ताबा सुटल्याने वाहन रस्ता सोडून बाजूच्या मोकळ्या माळारानात गेले. नेमके त्याचवेळेस दिवस उजाडल्याने वाहन तिथेच सोडून चोरटे पळून गेले.

दरम्यान, त्र्यंबकेश्वर शहराकडे जाणारे दुग्धव्यावसायिक, ग्रामस्थ यांनी वाहनाकडे कुतुहलाने जाऊन पाहिले असता त्यामध्ये दोन गायी आढळल्या. ग्रामस्थांनी तातडीने त्र्यंबक पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे सहकाऱ्यांसह तातडीने दाखल झाले.

उपस्थित ग्रामस्थांच्या मदतीने गायींची वाहनातून सुटका केली. वाहनामध्ये औषधे, इंजेक्शन आणि ब्रेड आढळले. यावरून गायींना ब्रेड खाऊ घालत इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले असावे. नंतर वाहनात कोंबून घेऊन जाताना अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, जमलेल्या जमावाने वाहनाची तोडफोड करत संताप व्यक्त केला. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी जमावाला आवर घालत इनोव्हा गाडी पोलिस ठाण्यात जमा केली. सोडवलेल्या गायींना दुपारी शुद्ध आली. त्यांच्यावर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. यातील एक गाय स्थानिक ग्रामस्थाची होती ती ताब्यात देण्यात आली.

गायींचा तपास लागणे शक्य

त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरातून मागील काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात गोवंश चोरीला जात आहे. याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. ताब्यात असलेल्या वाहनाच्या माध्यमातून पोलिस चोरट्यांपर्यंत पोहोचल्यास त्र्यंबकेश्वर शहर व परिसरातील चोरीस गेलेल्या गायींचा तपास लागणे शक्य असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : अपघातामुळे वाचले गायींचे प्राण ; बेशुद्धीच्या औषधांसह कार पोलिसांकडून जप्त appeared first on पुढारी.