Nashik : अल निनोचे संकट ; पाणीदार नाशिक जिल्ह्याला करावी लागणार पाणीबचत

गंगापूर धरण www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अल निनोच्या संकटामुळे मान्सून लांबण्याची शक्यता असताना एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात जिल्ह्यातील तब्बल नऊ धरणांमध्ये ३० टक्क्यांहून कमी जलसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे. संभाव्य अल निनोचे संकट विचारात घेता आतापासूनच पाण्याची बचत करणे गरजेचे आहे.

चालू वर्षी देशावर अल निनाचे संकट उभे ठाकले आहे. परिणामी, मान्सून लांबण्याची शक्यता असून, तो जेमतेम राहील, असा अंदाज हवामान क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्थानी व्यक्त केला आहे. हा धोका लक्षात घेत शासनाने आतापासून संभाव्य टंचाईला सामोरे जाण्यासाठी उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक पातळीवर यंत्रणांमार्फत धरणांमधील पाणीसाठ्याच्या थेंबाथेंबाचे नियोजन करण्यावर भर दिला जातो आहे. त्यामुळे एकीकडे पाणीबचतीसाठी यंत्रणा सरसावल्या असताना जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सध्या निम्म्याहून कमी साठा उपलब्ध असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमध्ये सद्यस्थितीत २९ हजार २२२ दलघफू इतका उपयुक्त साठा असून, त्याचे प्रमाण ४५ टक्के आहे. दरम्यान, ९ धरणांमध्ये ३० टक्क्यांहून कमी साठा शिल्लक आहे. तसेच दहा प्रकल्पांमध्ये ६० टक्क्यांपर्यंत तर केवळ ५ प्रकल्पांत ६० टक्क्यांहून अधिक जलसाठा आहे. संभाव्य अल निनोचे संकट विचारात घेता प्रशासनाच्या पाणीबचतीच्या मोहिमेला जिल्हावासीयांनी साथ देणे आवश्यक आहे.

धरणसाठा (दलघफू)

गंगापूर 2987, काश्यपी 1622, गौतमी-गोदावरी 498, आळंदी 304, पालखेड 294, करंजवण 1576, वाघाड 462, ओझरखेड 1007, पुणेगाव 167, तिसगाव 120, दारणा 4673, भावली 633, मुकणे 4218, वालदेवी 906, कडवा 485, नांदूरमध्यमेश्वर248, भोजापूर 88, चणकापूर 1311, हरणबारी 617, केळझर 241, नागासाक्या 57, गिरणा 5616, पुनद 1092.

नाशिकबाबत उद्या निर्णय

गंगापूर धरण समूहातील उपयुक्त पाणीसाठा व अल निनोचे संकट विचारात घेता नाशिक शहरात दर शनिवारी पाणीकपात लागू करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. तर मान्सून लांबल्यास जुलै व ऑगस्टमध्ये आठवड्यातून बुधवार व शनिवार असे दोन दिवस पाणीकपात होऊ शकते. या प्रस्तावावर मंगळवारी (दि.११) राज्यस्तरीय बैठकीत अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

माणिकपुंज कोरडेठाक

गिरणा खोऱ्यातील माणिकपूंज धरण आताच कोरडेठाक पडले आहे. तर गौतमी, करंजवण, वाघाड, पुणेगाव, तिसगाव, कडवा, भोजापूर, नागासाक्या या प्रकल्पांमध्ये ३० टक्यांहून कमी साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या गिरणात ३०.३६ टक्के साठा आहे.

  • -दहा प्रकल्पांमध्ये ६० टक्क्यांहून कमी पाणी
  • -पाच धरणांत ६० टक्क्यांपेक्षा अधिक

हेही वाचा : 

The post Nashik : अल निनोचे संकट ; पाणीदार नाशिक जिल्ह्याला करावी लागणार पाणीबचत appeared first on पुढारी.