Nashik : ‘पॅरोल’वर गेले ते परत आलेच नाही, नाशिकमध्ये 70 कैद्यांचा शोध सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असल्याने राज्यभरातील कारागृहांत कैद असलेल्या कैद्यांना तुरुंग प्रशासनाने पॅरोल आणि फर्लोवर सोडण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव घटल्यानंतर या कैद्यांना परत बोलावण्यास सुरुवात झाली. मात्र, नाशिक मध्यवर्ती कारागृहातील अंदाजे 60 ते 70 कैदी अद्याप परतलेले नाहीत. त्यांचा शोध सुरू असून, नाशिक परिक्षेत्रासह इतर परिक्षेत्रांत 25 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील 800 कैद्यांना पॅरोल व फर्लोवर सोडण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर एप्रिल 2022 मध्ये त्यांना 15 दिवसांच्या आत कारागृहात येण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार बहुतांश कैदी पुन्हा कारागृहात परतले आहेत. मात्र, काही कैदी अभिवचन व संचित रजेचा कालावधी संपूनही परतलेले नाहीत. त्यामुळे न परतणार्‍या कैद्यांचा शोध घेऊनही ते सापडत नसल्याने कारागृह प्रशासनाच्या वतीने कैदी राहात असलेल्या ठिकाणाजवळील पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले जात आहेत. शासनाने मार्च 2022 मध्ये कोरोनाच्या अनुषंगाने राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व निर्बंध काढले आहेत. त्यामुळे अधिसूचना रद्द करीत रजेवरील बंद्यांना कारागृहात दाखल करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.

अभिवचन रजेच्या तरतुदींचा नियमभंग
अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आलेल्या सर्व बंद्यांना परत बोलावण्यात आले, तरीदेखील काही बंदी परत आले नसल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे. नाशिक कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहातील 60 ते 70 बंदी अद्याप परतलेले नाहीत. कोरोना आकस्मिक अभिवचन रजेच्या तरतुदींचा नियमभंग व कारागृह नियमावलीच्या शीर्षकाखाली हे गुन्हे दाखल केले जात आहेत.

हेही वाचा :

The post Nashik : 'पॅरोल'वर गेले ते परत आलेच नाही, नाशिकमध्ये 70 कैद्यांचा शोध सुरू appeared first on पुढारी.