Nashik Crime : गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले, कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

गुटखा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भद्रकाली पोलिसांनी द्वारका भागातून गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडून त्यांच्याकडून सुमारे सव्वा पाच लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व कार जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरव कमलाकर सोनार (३३, रा. तिवंध चौक, भद्रकाली) व तेजस ओंकार बेलेकर (३०, रा. द्वारका) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. शहरातील शाळा-महाविद्यालयांलगत असलेल्या सर्व पानटपऱ्या आणि इतर अड्डे शोधून अमली पदार्थ विक्रेत्यांची धरपकड करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. भद्रकाली पोलिसांना द्वारका परिसरातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडत त्यांच्याकडून प्रतिबंधित सुंगधित पान मसाला, सुगंधित तंबाखू व कार असा एकूण ५ लाख २४ हजार ७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस अंमलदार कय्युम मोहम्मदअली सैय्यद यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितामार्फत गुटख्याचा पुरवठा व विक्री होत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

शैक्षणिक संस्थाभोवती नजर

शहरातील शैक्षणिक संस्थांभोवती पोलिसांनी करडी नजर ठेवली असून तेथे अंमली, तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी सुरु केलेल्या मोहिमेमुळे अंमली व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तरीदेखील कारवाईत सातत्य ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिस शैक्षणिक संस्थाभोवती पाहणी करत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik Crime : गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले, कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.