नाशिक : पुढारी वृत्तसेवा
फायनान्स कंपनीत कामास असल्याचे भासवून एकाने शहरातील क्रेडिट कार्डधारकांना सुमारे ३४ लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी भामट्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रितेश शांतीलाल शजपाल (३९, कॉलेज रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित कमलेश मनसुख खटकाळे (रा. अंबड लिंक रोड चिंचोळे शिवार) याच्याविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित कमलेश याने २४ ऑक्टोबर ते ३० डिसेंबर २०२३ यादरम्यान रितेश यांच्यासह इतर ४१ जणांना ३३ लाख ३५ हजार २८८ रुपयांचा गंडा घातला. रितेश व इतरांना मी बजाज फायनान्स या कंपनीत नोकरी करत असल्याचे भासवले. फसवणूक केलेल्यांचे आरबीएलचे क्रेडिट कार्ड बंद करून देतो असे दाखवून त्यांचा विश्वास संपादित केला. क्रेडिट कार्डची सगळी माहिती घेत भामट्याने परस्पर लाखो रुपये काढून त्यांचा अपहार केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रितेश व इतरांनी कंपनीकडे चौकशी केली असता त्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यामुळे रितेशसह इतरांनी गंगापूर पोलिस ठाण्यात कमलेश विरोधात फिर्याद दाखल केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र बैसाणे हे तपास करीत आहे.
मदतीच्या बहाण्याने फसवणूक
पोलिस तपासात संशयित कमलेश हा त्रयस्थ संस्थेमार्फत नेमलेला कर्मचारी होता. त्याने ज्या नागरिकांची फसवणूक केली ते रिक्षाचालक किंवा मोबाइलचा वापर जास्त न करता येणारे आहेत. त्याचा गैरफायदा संशयिताने घेतला. मदतीच्या बहाण्याने त्यांचे क्रेडीटकार्ड स्वत:कडे ठेवत होता. तसेच कार्डधारकांचे मोबाइल क्रमांक स्वत:च्या मोबाइलवर वळवून त्याने आर्थिक व्यवहार केले. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हेही वाचा:
- Ayodhya Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल
- राम मंदिरावर आरतीदरम्यान होणार लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
- Ayodhya Ram Mandir : “ढोंगी रामभक्तांना…” आशिष शेलारांचा ठाकरे गटावर निशाणा
The post Nashik Crime I क्रेडिट कार्डधारकांना ३४ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.