Nashik News I रस्त्यावर फेकलेल्या ‘नकोशी’मागील वास्तव उघड

अत्याचार

नाशिक (जानोरी) : पुढारी वृत्तसेवा

दिंडोरीतील शिवाजीनगर येथील मोकळ्या जागेत मंगळवारी (दि. १६) तीन दिवसांचे अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली हाेती. स्त्री जातीच्या अर्भकास पाेलिसांनी जिल्हा रुग्णालयात पाठवत तपास केला. त्यातून परिसरातीलच १३ वर्षाच्या मुलीने हे अर्भक फेकल्याचा प्रकार समाेर आला. संशयित पीडितेच्या चौकशीतून धक्कादायक बाब उघडकीस आली. शिकवणी घेणाऱ्या शिक्षकानेच केलेल्या अतिप्रसंगातून ती गर्भार राहून लोकलज्जेखातर हे कृत्य घडल्याचे समोर आले. त्यानुसार संशयित आराेपी संतोषकुमार सैनी (५८, रा. कानपूर, उत्तर प्रदेश, ह. मु. दिंडाेरी) याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस काेठडी सुनावली आहे, तर पीडितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिंडाेरीत गेल्या आठवड्यात हा प्रकार उघड झाला होता. शिवाजीनगर येथे दि. १६ जानेवारीला सकाळी बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने नागरिकांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. या अर्भकावर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले हाेते. प्रारंभी नकोशी म्हणून जन्मदात्रीनेच अर्भक टाकल्याचा संशय पोलिसांना आला होता. कुठलाही पुरावा नसताना पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उपनिरीक्षक मोनिका जजोट यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. एन. देशमुख, पी. एन. गारुंगे यांनी छडा लावला. पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता, १३ वर्षाच्या मुलीने बाळाला जन्म दिल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार मुलीची चौकशी केली असता, परिचयातील संतोषकुमार सैनी यानेच तिच्यावर अतिप्रसंग केल्याचे तिने सांगितले. ती नऊ वर्षांची हाेती, तेव्हापासून ती संतोषकुमारच्या घरी शिकवणीसाठी जात होती. गतवर्षी सहावीत असताना तिने शाळा सोडली. या दरम्यान तिला कामानिमित्त घरात बोलवत लैंगिक अत्याचार करीत गर्भवती केल्याचे संतापजनक कृत्य उजेडात आले.

मंगळवारी,दि.16 प्रसूत झाल्यावर त्या मुलीने ते बाळ लोकलज्जेखातर शिवाजीनगर परिसरात फेकून दिले होते. पाेलिसांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, सैनी याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा:

The post Nashik News I रस्त्यावर फेकलेल्या 'नकोशी'मागील वास्तव उघड appeared first on पुढारी.