नाशिक : पुढारी वृत्तसेवा – उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा प्रकोप कायम आहे. तापमानाच्या पाऱ्यात सातत्याने वाढ होत आहे. नाशिकमध्ये बुधवारी (दि. २२) हंगामातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर मालेगावमध्ये ४३ अंशांवर पारा पोहोचला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक घामाघूम झाले आहेत.
थंड हवेचे ठिकाण अशी बिरुदावली असलेले नाशिक शहराची नोंद हॉट शहरांच्या यादीत झाली आहे. शहराचा पारा ४२ अंशांवर जाऊन पोहोचला आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वात उच्चांकी तापमान ठरले आहे. यापूर्वी २८ एप्रिल २०१९ रोजी ४२.८ अंश तापमान शहरात नोंदविले गेले होते. शहरात सकाळपासून ऊन व ढगाळ हवामानाचा खेळ सुरू होता. त्यातच दुपारी दोनपर्यंत उन्हाचा तडाखा अधिक जाणवत होता. त्यामुळे रस्त्यावरून चालणेदेखील मुश्कील झाले. तर दोननंतर ढगाळ हवामान तयार झाले असले तरी उकाडा कायम होता. त्यामुळे नाशिककर घामाघूम झाले.
मालेगावमध्येही उष्णतेचा तडाखा कायम आहे. पारा थेट ४३ अंशांवर जाऊन स्थिरावला. त्यामुळे सामान्य मालेगावकरांच्या अंगाची अक्षरश: लाहीलाही झाली. उकाड्यापासून मुक्तता करून घेण्यासाठी एसी, कूलर, पंखे सुरू केले. परंतु, तेथूनही उष्ण हवाच येत असल्याने नागरिक हैराण झाले. निफाडचा पाराही ४२ अंशांवर जाऊन पोहोचला आहे.
शनिवारपर्यंत परिस्थिती कायम
राज्यात मागील चार दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे. विविध जिल्ह्यांच्या तापमानामध्ये सरासरी २ ते ४ अंशांची वाढ झाली आहे. वातावरणातील खालच्या स्तरात निर्माण झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे उष्णतेचा तडाखा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रातही तापमानवाढीचा परिणाम दिसून येत आहे. येत्या शनिवारपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. यादरम्यान, राज्याच्या काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या मान्सूनपूर्व सरी हजेरी लावू शकतात.
हेही वाचा: